बेनकनहळ्ळी येथील घटना : प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
वार्ताहर / हिंडलगा
बेनकनहळ्ळी येथील शिवारात लोंबकळणाऱया वीज वाहिन्यांचा एकमेकाला स्पर्श होऊन ठिणगी पडल्याने गवत घेऊन जाणाऱया ट्रक्टरला आग लागली. आगीत संपूर्ण गवतासह ट्रॉली जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. 15) सकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंगडी कॉलेजसमोरील शिवारातून महादेव लाड यांच्याकडून मनोहर पिसाळे यांनी गवत खरेदी घेतले होते. ते आणण्यासाठी गावातीलच शेतकरी रामदास येळ्ळूरकर यांच्या मालकीचा ट्रक्टर घेऊन सोमवारी सकाळी गेले होते. या दरम्यान ट्रक्टरमध्ये गवत भरून आणताना रस्त्यावर लोंबकळणाऱया वीजवाहिन्यांचा स्पर्श गवताला झाल्याने ठिणगी पडून आग लागली. त्यामुळे ट्रक्टर चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक्टरचे इंजिन ट्रॉलीपासून दूर केले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. त्यानंतर लागलीच अग्निशमन दलाला पाचारण केले. पण तोपर्यंत गवतासह ट्रॉली जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱयाचे सुमारे 15 ते 20 हजार रुपये व ट्रक्टर ट्रॉलीचे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.









