काँग्रेसचा पराभव करण्याचा निर्धार
प्रतिनिधी /म्हापसा
कळंगूट काँग्रेसचे नेते जोसेफ सिक्वेरा, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व माजी जिल्हा पंचायत अँथोनी मिनेझीस यांनी लोकसभा खासदार महुआ मोहित्रा यांच्या उपस्थितीत कळंगूट येथे एका कार्यक्रमात रितसर तृणमूलमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार किरण कांदोळकर, चर्चिल आलेमाव उपस्थित होते. राज्यात आज सर्वत्र तृणमूलचा उदो-उदो चालला आहे. कळंगुटमध्ये माजी मंत्री मायकल लोबो यांचा पराभव करण्यासाठी सर्वजण एकत्रित आले आहे. त्यांच्या एकवटीने आता काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे त्या म्हणाल्या. आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले की, राज्यात आता भाजप व काँग्रेसला जनता कंटाळली असून जनतेने तृणमूलला साथ देऊन कळंगुटमध्ये बदल घडवून आणावा, असे आवाहन केले.
किरण कांदोळकर म्हणाले की, तीन डायमंड एकत्रित आले आहे. कळंगुटमध्ये काँग्रेस, भाजपला पराभव करण्यासाठी जनतेने एकत्रित येऊन तृणमूल पक्षाला साथ द्यावी व तृणमूलच्या उमेदवारास भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. आग्नेल फर्नांडिस म्हणाले की, त्यांचा शत्रू भाजप आहे आणि कळंगुटच्या लोकांनी चांगल्या संधीसाठी टीएमसीला मतदान करावे. जर मायकल लोबो जिंकले तर ते पुन्हा भाजपमध्ये सामील होतील. आम्ही भाजपशी लढण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे. संपूर्ण कळंगूट काँग्रेस गटाने मायकल लोबो यांच्या प्रवेशानंतर राजीनामा दिला कारण त्यावर सर्वजण नाखूष आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी कोणाचाही सल्ला घेण्यात आला नाही. असे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये कोणतीही निष्ठा उरलेली नाही. आमचा नारा लोबो हटाओ, कळंगूट बचाओ असायला हवा होता पण आता काँग्रेस हटाओ, गोवा बचाओ असाच असेल. कळंगूट हे ड्रग्स, वेश्याव्यवसाय आणि गुंडाराज यांचे स्वर्ग बनले असून या सर्व बाबी रोखण्यात आमदार मायकल लोबो अपयशी ठरल्याचेही फर्नांडिस म्हणाले.
आम्ही आमदारांना घरी पाठविले आहे. आमच्या 3 पैकी कोणालाही तिकीट मिळाले तर आम्ही अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देऊ. काँग्रेसने आमचा विश्वासघात केला आहे. कळंगुटमध्ये आमच्यापैकी कोणालाही तिकीट मिळाले तरी आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे फर्नांडिस म्हणाले.









