बेंगळूर : विधानपरिषदेच्या आग्नेय पदवीधर मतदारसंघात देखील भाजपने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवारांनीच बाजी मारली आहे. आग्नेय पदवीधर मतदारसंघातून चिदानंद गौडा निवडून आले आहेत. 28 ऑक्टोबर रोजी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील प्रत्येकी दोन जागांसाठी मतदान झाले होते. मंगळवारी मतमोजणी झाली. पश्चिम पदवीधर मतदारसंघातून एस. व्ही. संकनूर, बेंगळूर शिक्षक मतदारसंघातून पुट्टण्णा आणि ईशान्य शिक्षक मतदारसंघातून शशिल नमोशी विजयी झाले होते. मात्र, आग्नेय पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बुधवारी सकाळी जाहीर केला.
विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेस आणि निजदला विधानसभेच्या चारीही जागांच्या निवडणुकीतही दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे भाजपने सर्वच जागांवर विजय संपादन करत जोरदार मुसंडी मारली आहे.









