प्रतिनिधी / काणकोण आगोंद,
काणकोण येथील विवेकानंद रघुनाथ ना. गावकर यांचे 28 रोजी निधन झाले. 29 रोजी आगोंद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. उत्कृष्ट नाटय़कलाकार आणि मराठीचे जाज्वल्य अभिमानी राहिलेल्या विवेकानंद यांनी आगोंद येथील नूतन नाटय़संपदा, आगोंद स्पोर्ट्स क्लब, आगोंदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्था, गोमंतक मराठी अकादमीची काणकोण शाखा, श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान या समित्यांवर काम केले होते. चार रस्ता येथील सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रुसांव शैक्षणिक संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे ते सध्या सरचिटणीस होते. यापूर्वी काणकोण तालुका कृषी सहकारी संस्थेवर व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. त्यांच्या निधनाने एक क्रियाशील कार्यकर्ता आम्ही गमावला असल्याची प्रतिक्रिया सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रुसांव संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देसाई आणि सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केली आहे.









