बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मधील बापूजी नगर येथे असलेल्या केमिकल फॅक्टरीत मंगळवारी भीषण आग लागली होती. आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी गुरुवारी केमिकल फॅक्टरीला भेट दिली. यावेळी मंत्री सुधाकर यांनी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. मंगळवारी आग लागल्यानंतर कारखान्याच्या गोदामाचे मालक असलेल्या तीन जणांना बुधवारी पोलिसांनी अटक केली होती. या परिसरातील घरे आणि वाहनांसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सज्जनराज (वय ६६), त्यांची पत्नी कमला सज्जनराज (वय ६०) आणि त्यांचा मुलगा अनिल कुमार (३०) यांना बुधवारी शंकरपुरम येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले, सज्जनराज रेखा केमिकल इंडस्ट्रीजचे नोंदणीकृत मालक आहेत, तर कमला आणि अनिल रेखा केमिकल्स कॉर्पोरेशनचा व्यवसाय सांभाळत आहेत.
आग लागली तेव्हा कारखान्यात ४ कर्मचारी होते. पण त्यांना त्यावेळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान यावेळी मोठा अनर्थ टळला. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.









