कराड / प्रतिनिधी :
पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगांव, ढोकवळे येथे भूस्खलन होऊन जीवितहानी झाल्याच्या घटनांनी सातारा जिल्हा हादरला आहे. या वातावरणात कराड तालुक्यातील मलकापूर येथे आगाशिव डोंगरावरती पावसाने डोंगर खचून भूस्खलन झाल्याचे सोमवारी समोर आले. नागरी वस्तीपासून डोंगराकडे अवघ्या तीनशे फूटावर हा प्रकार घडला आहे. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नसला तरी प्रशासनाने हा प्रकार गांभिर्याने घेत पाहणी सुरू केली आहे.
दरम्यान या घटनेमुळे आगाशिवनगर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे आगाशिवनगर डोंगराच्या उत्तरेकडील बाजूचा काही भाग खचला. खचलेला भाग झाडाझुडपांसह उताराच्या दिशेने मानवी वस्तीकडे सरकायला सुरूवात झाली. झाडेझुडपे तसेच नगरपरिषदेने बांधलेली संरक्षक भिंतींमुळे हा भाग फार खाली आला नाही असे स्थानिक नागरिकांनी सांंगितले त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान आगाशिवनगर डोंगर खचल्याची बाब सोमवारी सकाळी डोंगरावरती फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर प्रशासनाने तातडीने पाहणी करून त्यावर बैठक घेण्याची कार्यवाही सुरू केली.









