प्रतिनिधी/ बेंगळूर
आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी मतभेद विसरून एकत्रित लढण्याची गरज आहे, अशी सूचना राज्य काँग्रेसचे प्रभारी रणजित सुरजेवाला यांनी दिली. ग्रामपंचायत, बेंगळूर महानगरपालिका, मस्की, बसवकल्याण, बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकच्या पार्श्वभूमीवर रविवारी त्यांनी बेंगळुरात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली.
राजराजेश्वरी आणि सिरा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस नेत्यांनी खचून जाऊ नये. पक्षाकडे विशिष्ट व्होट बँक आहे. त्याकडे लक्ष केंद्रीत करून विजयासाठी परिश्रम करणे आवश्यक आहे. भाजपने नागरिकांना दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. काँग्रेसचे मुख्य ध्येय सत्ता मिळविणे नसून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आहे. ही जबाबदार आम्ही समर्थपणे हाताळल्यास सत्ता आपोआप येईल, असे त्यांनी सांगितले.