प्रतिनिधी / कोल्हापूर
आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन अखिल भारतीय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार तसेच विद्यमान पदाधिकाऱयांवर सभासद नोंदणीची जबाबदारी द्यावी, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सोनल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सभासद नोंदणी अभियान आणि संघटनात्मक कामकाजाची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, सह प्रभारी राजेंद्र शेलार, रणजितसिंह देशमुख, चेतन चव्हाण, बाजीराव खाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना, सोनल पटेल यांनी बुथ निहाय सभासद नोंदणीचा आढावा घेतला. तर आगामी काळात अधिकाधिक सभासद नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पटेल म्हणाल्या, आगामी काळात कोल्हापूर महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिकाधिक सभासद नोंदणी पूर्ण करावी. इच्छुकांनी सभासद नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. सभासद नोंदणीमध्ये महिलांना प्राधान्य द्यावे असेही पटेल यांनी सुचित केले. ज्या सभासदांची ऑनलाईन नोंदणी (डिजिटल मेंबरशिप) करायची आहे, त्यांचा मतदान ओळखपत्र क्रमांक नोंद करणे आवश्यक आहे. अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयाकडून अशी सभासद नोंदणी गृहित धरली जाणार नाही. कोल्हापूर जिह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सभासद नोंदणीचे उत्कृष्ट काम करतील अशी आशा पटेल यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री पाटील यांच्यावर राज्याची जबाबदारी गरजेची
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राजेंद्र शेलार म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवावेत. कार्यकर्त्यांनी सजग राहून कामाला लागावे. कोल्हापूर जिह्यात पालकमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसचे शिलेदार असून त्यांनी आता जास्तीत जास्त वेळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्यावा. राज्याच्या राजकारणात त्यांची खुप गरज आहे. त्यामुळे येथील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कॉंग्रेसची धुरा स्वयंस्फुर्तीने स्वत: सांभाळावी असे शेलार यांनी आवाहन केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, सहप्रभारी रणजितसिंह देशमुख, सचिव चेतन चव्हाण, आदींनी मनोगत व्यक्त केले.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी, सभासद नोंदणी संदर्भात माहिती दिली. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, गुलाबराव घोरपडे, सरलाताई पाटील, सुलोचना नाईकवाडे, संध्या घोटणे, गोपाळराव पाटील, जिल्हा सचिव संजय पवार-वाईकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









