प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकरी कायद्याविरोधात दिल्लीत चौदा दिवस शेतकऱयांचे आंदोलन सुरु आहे. आमची शेती कोणी आदानी, अंबानीच्या ताब्यात जाऊ नये आणि एमएसपी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी त्यांची प्रामाणिक मागणी आहे. पण या आंदोलनात चीन व पाकिस्तानचे लोक घुसले असल्याचा आरोप करत भाजपकडून खिल्ली उडवली जात आहे. केंद्रातील भाजप सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला भुईसपाट करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरुण लाड आणि `शिक्षक’चे आमदार जयंत आसगावकर यांचा जाहीर सत्कार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल येथे पार पडला. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा आणि भव्य पुष्पहार अर्पण करून नूतन आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजू आवळे, माजी आमदार दिनकरराव जाधव, सत्यजीत पाटील, सुजित मिणचेकर, जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश सतीश, माजी महापौर निलोफर आजरेकर, जि.प.सदस्य युवराज पाटील, सरला पाटील, सुप्रिया साळुंखे, प्रताप उर्फ भैया माने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जीवाभावाच्या माणसांमुळेच महाविकास आघाडीला यश
मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बहुजन समाजाची नाही तर विशिष्ट विचारधारेची आहे, असा भाजपचा समज होता. पण पुणेसह नागपूरमधील 55 वर्षांचा इतिहास जाणकार मतदारांनी मोडीत काढला. उमेदवार कोण आहेत ? हे न पाहता ही निवडणूक आपली आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी जीवाचे रान कारून मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्याना सलाम करतो. राज्यात भाजप सत्तेत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ही सत्तेची सूज असल्याचे सांगितले होते. पैसे उधळून लोक जवळ येत नाहीत. त्यासाठी लोकांची आयुष्यभर सेवा करावी लागते. जिवाभावाच्या माणसांमुळे महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. यापुढील सर्व निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवू असेही त्यांनी स्पष्ट केले.
वल्गना करणाऱ्यांना मतदारांनी लोकशाहीची ताकद दाखवली
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. संघटित ताकत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मागे राहिली. या निवडणुकीत पाच जिह्यातील पक्षीय ताकद गरजेची होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वीच दिवाळी झाली असली तरी निकालाचा दिवस महाविकास आघाडीसाठी मोठÎा सणाचा दिवस ठरला. मतदानादिवशी पहिल्या फेरीतच आमचा उमेदवार निवडून येईल, आता केवळ ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक उरली आहे अशी वल्गना करणाऱयांना लोकशाहीची ताकद काय आहे ? हे मतदारांनी दाखवून दिले आहे. पाचही जिह्यातील कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळवून दिले. दोन नंबरची मते कोणाला मिळतात ? याबाबत मनात तणाव होता. मात्र प्रा.जयंत आसगवाकर व अरुण लाड यांनी जे लीड घेतले होते ते तुटले नाही. या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात विकासाला नक्कीच चालना मिळेल अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. पूर्वीपासूनच खासदार धैर्यशील माने आमच्यासोबत असते, तर राजाराम कारखाना हातात असता. भविष्यातील सर्व निवडणुकाही आपण एकत्र लढविणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील
आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, हा सत्कार स्वीकारतांना आपल्याला महाविकास आघाडीचा अभिमान वाटतो. शिक्षकांनी आपल्यावर विश्वास ठेवला तो नक्कीच सार्थ ठरवू. शपथ विधीनंतर पहिल्याच दिवशी शिक्षकांची काही प्रलंबित कामे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्याने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन मार्गी लागली आहेत. यापुढेही शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी चांगली कामगिरी करू असा विश्वासही आमदार आसगावकर यांनी दिला.
पदवीधरमधील माजी आमदारांना मतदारांनी जागा दाखवली
आमदार अरुण लाड म्हणाले, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडूण आणायचे म्हणून सर्वजण कामाला लागले होते. त्यामुळे सांगली जिह्याबरोबरच कोल्हापूर जिह्याचा मोठा वाटा माझ्या विजयात आहे. यापूर्वी निवडून गेलेल्या आमदारांनी बारा वर्षात काही काम केले नाही. पदविधारांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली.
आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचा मानस
यावेळी खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, भरत रसाळे आदींनी मनोगत व्यक्त करून या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी भक्कम झाल्याचे स्पष्ट केले. आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवावी अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
निवडणुकीमध्ये शिवसेना सर्वासोबत, पण विजयानंतर आभार नाही
शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मनापासून तळमळीने काम केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर आम्ही आनंदी झालो. पण निकालानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱयांचे कोणीही आभार मानले नाही अशी खंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केले. त्यानंतर बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांनी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांचे आभारी असल्याचा निरोप माझ्याकडे दिला होता. माझ्याकडून तो शिवसेना पदाधिकाऱयांना सांगायचे विसरले असल्याचे स्पष्ट करून नाराजीनाट्या वर पडदा टाकला.