सदरचा खर्च 2020-2023 मध्ये होण्याचे संकेत
वृत्तसंस्था / बेंगळूर
जागतिक अर्थव्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्याचे काम वेगाने होत असल्याचे पहावयास मिळत आहे. येत्या काळात आणि एकंदर गतकाळात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. हे पाहता या क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक खर्च करण्याची गरज असून 2020 ते 2023 या कालावधीत आयटी(माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रावर जवळपास 6800 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय डाटा कॉर्पोरेशन(आयडीसी) यांच्याकडून नुकतीच देण्यात आली आहे.
आयडीसीच्या माहितीनुसार कोरोना संकटामुळे 2020 मध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु जागतिक अर्थव्यवस्थेचा डिजिटल प्रवास वेगाने सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि सेवांमध्ये डिजिटल डिलिव्हरी मॉडेलसह उभारणी करणार असल्याचेही आयडीसीने सांगितले आहे.
जागतिक जीडीपीत डिजिटलचा हिस्सा
येत्या 2022 पर्यंत जागतिक पातळीवरील जीडीपीमध्ये 65 टक्क्यांचा हिस्सा हा डिजिटलचा राहणार असून यासाठी 2020 ते 2023 पर्यंत आयटीवर 6800 अब्ज डॉलर्सचा खर्च केला जाणार असल्याचे यावेळी नमूद केले आहे.









