वृत्तसंस्था/ मुंबई
2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेविषयी बीसीसीआयने आतापासूनच पूर्वतयारीला प्रारंभ केला असून चालू र्षाप्रमाणेच ही स्पर्धा आठ संघांचा सहभागाने खेळविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
2021 च्या आयपीएल स्पर्धेला जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी बाकी असून यावेळी आणखी एक किंवा दोन नव्या संघांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण बीसीसीआयने 2021 च्या आयपीएल स्पर्धेत आठ संघ खेळविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. 2022 च्या आयपीएलपासून या स्पर्धेच्या रूपरेषेमध्ये बदल केला जाईल, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. 24 डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणाऱया बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब केला जाईल. 2021 च्या आयपीएल स्पर्धेत जादा दोन नव्या प्रँचायजीना संधी देण्याबाबत मंडळाच्या सदस्यांमध्ये काही दिवसापूर्वी चर्चा करण्यात आली होती. येत्या फेब्रुवारी किंवा मार्च किंवा एप्रिल महिन्यात बीसीसीआयकडून कदाचीत नव्या इच्छूक प्रँचायजीकडून अर्ज मागविले जातील. पण पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी पुरेसा कालावधी नसल्याने मंडळाकडून यावेळी आठ संघांना 2021 च्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2020 च्या आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकाविले आहे. आगामी आयपीएल स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव मोठय़ा प्रमाणात होण्यासाठी कोणाचीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.









