प्रतिनिधी/ सातारा
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस बुधवार दि. 30 रोजी आहे. वाढदिवसानिमित्ताने आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्याकरता गल्लीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांपासून ते पेठेतल्या मोठय़ा कार्यकर्त्यांनी गल्लोगल्ली शुभेच्छांचे फलक लावले गेले आहेत. त्यामुळे आख्खी राजधानी शिवेंद्रसिंहराजेमय झालेली आहे. वाढदिवसानिमित्ताने सातारा शहरात प्रत्येक कार्यकर्त्यांकडून हटके शुभेच्छा देण्याकरिता आपल्या वॉर्डात, आपल्या पेठेत वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 रोजी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टीचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच गांधी मैदानावर भव्य महापंचायतन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सर्वच कार्यकर्ते आमदार शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत.
सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा शहर गेल्या पाच ते सहा दिवसापासून शुभेच्छा फलकांनी सजू लागलेले आहे. सदरबझारपासून पोवई नाक्यापर्यत, गोडोली नाक्यापासून शाहूनगरपर्यंत, रविवार पेठेपासून मल्हारपेठेपर्यंत, मंगळवार पेठेपासून राजवाडापर्यंत अगदी शुक्रवार पेठेतही त्यांच्या शुभेच्छांचे फलक लागलेले आहेत. फलक लावण्याची कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागल्याची दिसून येत आहे. सातारा पालिकेसमोर ही मोठमोठाले फलक त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. केवळ शुभेच्छा फलकावर आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी न थांबता वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी आपल्या पेठेत नागरिकांसाठी विविध शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, ईश्रम कार्ड नोंदणी शिबिर आदींचा समावेश आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी अनोख्या शुभेच्छा देण्यासाठी नियोजन केले असून हे दि. 30 रोजी त्यांच्या या शुभेच्छा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवघा सातारा हा शिवेंद्रसिंहराजेमय झाल्याचे दिसून येत आहे.
शिवतीर्थावर होणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवईनाका येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचेही आयोजन केले आहे. प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनाची सुसूत्रता आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांमधून करण्यात आलेली आहे.
गेल्या चार दिवसापासून उपक्रमांचा धडाका
आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहर व तालुक्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले असून गेल्या चार दिवसापासून त्याचा धडाका सातारकरांना पाहायला मिळत आहे. अगदी बैलगाडय़ांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वतः शिवेंद्रराजे हे कार्यकर्त्यांमध्ये डान्स करण्यात दंगून गेले. कार्यकर्तेही त्यांच्यासोबत उत्साहाने त्या डान्समध्ये सहभागी झाले. बैलगाडय़ांच्या शर्यतीला त्यांच्या या अनोख्या डान्समुळे आणखी रंगत आली होती.








