नवी दिल्ली / वृत्तसंस्था
व्हॉट्स्अप गटामधील सदस्यांनी त्यावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यास त्यासाठी गटाच्या ‘ऍडमिन’ला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय केरळच्या उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा गटांचे ऍडमिनिस्ट्रेटर्स किंवा निर्माते (क्रिएटर्स) यांना अशा मजकुरासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यरित्या जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने पोक्सोसंबंधी प्रकरणात स्पष्ट केले.
‘ऍडमिन’चे मजकुरावर कोणत्याही प्रकराचे नियंत्रण नसते. मजकूर पोस्ट केल्यानंतरच त्याला त्यासंबंधी समजते. त्याला प्रथम दाखवून मजकूर पोस्ट केला जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला जबाबदार धरता येणार नाही. असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱयाचीही ही जबाबदारी असते, असे स्पष्ट करण्यात आले. एका व्यक्तीने एक पेंड्स् या नावाने एक व्हॉटस्अप गट तयार केला होता. आणखी दोन व्यक्तींनाही त्याने ऍडमिन म्हणून नेमले होते. त्यांच्यापैकी एकाने बालकांशी संबंधित अश्लील मजकूर व्हॉटस्अप गटावर पोस्ट केला. पोलिसांनी या गटाच्या मुख्य ऍडमिनिस्ट्रेटरवरही पोक्सो अंतर्गत प्रकरण सादर केले. मात्र, त्याला उत्तरदायी मानता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला. यापूर्वी मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयांनीही अशाच अर्थाचे निर्णय दिले आहेत.









