15 ऑगस्टला आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा 76वा वर्धापनदिन उत्साहाने साजरा केला. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वदेशीवरती प्रामुख्याने भर दिल्याने आजही राष्ट्राला सशक्त करण्यासाठी स्वदेशी वस्तुच्या वापराला अधिकाधिक प्राधान्य दिले जात असले. तरी आपल्या पर्यावरणात विदेशी वृक्षवनस्पतींचे जे प्रस्थ वाढत चाललेले आहे आणि त्याचा परिसंस्थेवर होणाऱया दुष्परिणामांकडे आम्ही कानाडोळा करीत आहोत. भारतभरात गेल्या काही वर्षांपासून अन्नधान्याच्या होणाऱया आयातीमुळे बऱयाच विदेशी वनस्पतीच्या बियाणांचा प्रसार झपाटय़ाने झालेला असून, आज त्यांच्या झुडुंपांनी स्थानिक वृक्ष-वनस्पतींच्या पैदासीसमोर आव्हाने उभी केलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशासमोर निर्माण झालेल्या अन्नधान्यांच्या तुटवडय़ाच्या समस्येवर मात करण्यासाठी गव्हाबरोबर अन्य धान्यांची आयात केली. त्यावेळी धान्यांसमवेत आक्रमकरित्या मिळेल तेथे वाढणाऱया विदेशी प्रजातीच्या वनस्पतींचा प्रसार झाला. आज आपल्या जंगलांची कधीकाळी शान ठरलेल्या करवंदे, चारा, कारवीसारख्या स्वदेशी वनस्पतीच्या प्रजातींचे अस्तित्व दुर्बल होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
आज आपल्या दक्षिण भारतातल्या जनतेला अधिकाधिक पेयजल आणि सिंचनाची सुविधा पुरवणाऱया ज्या नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांत होतो, तेथील दुर्गम गणल्या जाणाऱया जंगलात विदेशी वनस्पतीच्या प्रजाती पोहोचल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम जाणवू लागलेले आहेत. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या जंगलात आजमितीस युफोटोरीयम ऑडोरेटम, पार्थेनियम हिस्टोफोरस या काँग्रेस गवत म्हणून ओळखल्या जाणाऱया वनस्पतींच्या झुडुपांचा प्रसार झालेला आहे. ब्राझिलवरून आलेल्या काजू या नगदी पिकाची लागवड स्थानिकांनी कुमेरी शेतीच्या जागेत मोठय़ा प्रमाणात केली आणि त्या बागायतीत युफोटोरीमत ऑडोरेटम आणि पार्येनियम हिस्टोफोरसचा विस्तार होत असलेला पाहायला मिळत आहे. युफोटोरीयम ऑडोरेटम या वनस्पतीवर जेव्हा छोटेखानी सफेद फुले फुलतात, तेव्हा तेथेच गोचिडांची पैदासी होते. हे गोचिड माकडांचे चावे घेतात आणि माकडाच्या संसर्गाद्वारे त्या परिसरात वावरणाऱयांवर माकडतापाची शिकार होण्याची वेळ येते. कर्नाटकातल्या शिमोग्याजवळच्या क्यसनूर जंगलातून माकडतापाचा प्रादुर्भाव झाल्याने क्यसनूर फोरेस्ट डिसिजचा (केएफडी) प्रसार झालेला आहे. एकेकाळी गोवा-महाराष्ट्र राज्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या माकडतापाचा प्रसार कोविड महामारीच्या पूर्वी झाला होता आणि बऱयाच रुग्णांना मृत्यू आला होता. गेल्या अर्धशतकापासून झपाटय़ाने विदेशी वनस्पतींच्या विविध प्रजातींचा प्रसार दक्षिण आशियात झाल्याने सुमारे 33.5 बिलियन अमेरिकन डॉलरची आर्थिक नुकसानी सोसावी लागलेली आहे. स्थानिक वृक्ष-वनस्पतींच्या लागवडीतली उत्पादन क्षमता कमी होण्याबरोबर त्या परिसरात पर्यावरणाला घातक ठरणाऱया परिसंस्थेला निमंत्रणाचे कारण ठरलेल्या आहेत. त्यामुळे जागतिक संवर्धन समुदायाने आक्रमकरित्या प्रसारित होणाऱया विविध विदेशी वनस्पतींचा अभ्यास करणाऱया विशेषज्ञांना संशोधन करण्यासाठी प्रेरित करून, त्याचे मुख्यालय न्यूझिलंडमध्ये स्थापन केलेले आहे. या संस्थेतर्फे जगभरात विदेशी वनस्पतींच्या प्रसाराच्या वाढणाऱया संकटाला रोखण्यासाठी आणि त्यांचे समूळरित्या उच्चाटन करण्यासाठी लोकजागृती केली जात आहे. आंतरराष्ट्रीय संवर्धन समूदायामार्फत विदेशी वनस्पतींचा जो आक्रमकरित्या प्रसार होत आहे, त्याचे निर्मूलन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केलेली आहे परंतु असे असताना विदेशी वनस्पतींच्या प्रजातींचे संकट ठाण मांडून बसलेले आहे.
गुलाबी पुष्पांच्या सौंदर्याची भ्रांती निर्माण करणारी अँटीगोनन लॅप्टोप्स ही वेलवर्गीय वनस्पती अंदमान आणि निकोबार द्विपसमूहापासून सहय़ाद्रीत पोहोचलेली आहे. झपाटय़ाने वाढणाऱया पिवळय़ा रंगाच्या झुडुपवर्गीय असणाऱया काशिया सेन्ना स्पेक्टाबिलीस वनस्पतींचे प्राबल्य सहय़ाद्रीच्या जंगलात निर्माण झालेले आहे. स्थानिक झुडुपांची वाढ नियंत्रित करून, त्यांच्या अस्तित्वाला रोखणारी ही वनस्पती आपल्या आकर्षक फुलांची मोहिनी प्रकर्षाने घालत आहे. जेथे जेथे एकेकाळी तृणपाती, वेली, झुडुपे जोमाने दिसू लागायची, तेथे तेथे विदेशी वनस्पतींच्या प्रजातींचे प्रस्थ आपणाला पाहायला मिळत आहे. जलसिंचनासाठी खोदलेल्या कालव्यांच्या परिसरात ते राखीव जंगलक्षेत्रातल्या उपलब्ध जमिनीत या प्रजातींतल्या वनस्पती रिकाम्या जागेबरोबर अन्य स्थानिक वनस्पतींची वाढ रोखून तेथे दिसू लागलेल्या आहेत. आज आपल्या रंगरुपांनी या विदेशी वनस्पतींनी स्थानिकांना इतके आकर्षण निर्माण केलेले आहे की, त्यांच्या परकेपणाचे विस्मरण झालेले आहे आणि त्यामुळे परिसराला घातक असणाऱया विदेशी वनस्पतींच्या प्रजातींच्या एकंदर विस्ताराकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आज गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतल्या बऱयाच जंगलक्षेत्रात विदेशी वनस्पतींच्या प्रजातींनी प्रवेश करून तेथील वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासासमोर प्रतिकुल परिस्थिती उभी केलेली आहे. तलाव, तळय़ांबरोबर छोटय़ा-मोठय़ा जलाशयांत विदेशी प्रजातींच्या जलपर्णींचा इतका विस्तार झालेला आहे की, त्यामुळे जमिनीची भ्रांती निर्माण होऊन तेथे माकडांनी उडय़ा मारल्याने त्यांना जलसमाधी मिळण्याच्या दुर्घटना उद्भवलेल्या आहेत. हायसिंथ आयचोमिया, क्रास्सीपस आणि बेशरम इपोमिया कार्निया अशा जलपर्णीच्या प्रजातींनी आक्रमकरित्या जलस्रोतांना झाकोळून टाकलेले आहे. 1600 संवहनी वनस्पती ज्यात 140 पाण्यात पैदासी होणाऱया वनस्पतीच्या प्रजाती विदेशातून भारतात प्रसारित झालेल्या आहेत. अमेरिका, आफ्रिका, युरोप आणि अन्य आशियाई राष्ट्रांतल्या विदेशी वनस्पतींच्या प्रजातींचा प्रसार झालेला आहे. लीटेना कॅमेरा, मायकानिया मायक्रांथा, मायमोसा इन्वीसिया, सायटीसस स्कोपारीयस अशा विदेशी वनस्पतींच्या प्रजातींचा व्यापक प्रमाणात प्रसार झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
विदेशातून आयात केलेल्या अन्न-धान्यांतून, बागेत लावल्या जाणाऱया रंगीबेरंगी वनस्पतींतून ज्या आयात करण्यात आल्या, त्यांना भक्ष्य करणाऱया इथे असलेला अभाव, विलक्षणरित्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता, त्याचप्रमाणे होणारी प्रभावी प्रजनन क्षमता यामुळे विदेशी वनस्पतींचे प्रस्थ भारतभर पाहायला मिळत आहे. विदेशातून आलेल्या काही वनस्पतींनी इथल्या परिस्थितीशी इतके जुळवून घेतलेले आहे की, त्यांना परकीय ठरविणेसुद्धा बरेच कठीण ठरलेले आहे. काँग्रेस गवत, रानमारी, बेशरम, कंदील पुष्प, घाणेरी अशी स्वदेशी स्वरुपातल्या नावांमुळे त्यांच्या विदेशीपणाचे समाजाला विस्मरण झालेले आहे. इथल्या हवामान, जमिनीचा कस, पर्जन्यवृष्टी आदी घटकांमुळे स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींनी इथली जंगले एकेकाळी समृद्ध होती. त्यामुळे त्यांच्या फुला-फळांवर, कंदमुळांवर वन्यजीवांच्या असंख्य प्रजातींची पैदासी झाली होती परंतु आज विदेशी वनस्पतींच्या प्रजातींच्या प्रसारामुळे वन्यजीवाच्या एकंदर नैसर्गिक अधिवासात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊन उद्भवलेल्या संकटांनी पर्यावरणाला बाधा पोहोचविलेली आहे आणि त्यासाठी त्यांच्या निर्मूलन आणि व्यवस्थापनासाठी नियोजनबद्ध उपाय होणे गरजेचे आहे.
– राजेंद्र पां. केरकर








