मोदी-शहा यांनी ममतांना पळता भुई थोडी केली आहे. बंगालमध्ये भाजप आला तर त्याचे ‘मिशन महाराष्ट्र’ सुरू होईल आणि महाविकास आघाडीत बिघाडी होईल अशी भाकिते राजधानीच्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहेत.
विधानसभा निवडणुकात बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे बारा वाजोत आणि आसाममध्ये परत भाजपच विजयी होवो. कारण असे घडल्यावरच विरोधी पक्षांचे डोके ठिकाणावर येईल आणि ते आक्रमक भाजपच्या विरोधात युती बनवण्यासाठी प्रयत्न करतील’, असे विधान एका राजकीय निरीक्षकाने गेल्या आठवडय़ात केले होते. बोलाफुलाला गाठ पडावी त्याप्रमाणे ममतादीदींनी त्याच सुमारास पंधरा विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून भाजपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ऐक्मयाचे आवाहन केले आहे. नंदीग्राममधील निवडणूक एक दिवसावर होती तेव्हाच हे आवाहन आल्यामुळे ममतादीदी घाबरल्या आहेत असा प्रचार भाजपने सुरू केला आहे तो फारसा चुकीचा वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जो धुवाधार प्रचार केला आहे त्याचा रेटाच एवढा जबरदस्त आहे की कोणाचीही छाती दडपावी. मोदी-शहा जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा त्यांना काहीही करून विजयश्री मिळवायची असते त्यामुळे निवडणुकीला कोणते नियमच ते लागू होऊ देत नाहीत असे आरोप वारंवार होत आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत फक्त विरोधी पक्षनेत्यावर अथवा त्यांच्या समर्थकांवर इन्कम टॅक्स, ईडीच्या धाडी कशा पडतात हेही कोडेच आहे. ‘दागदार’ असलेले विरोधी नेते भाजपमध्ये गेल्यावर ‘शुचिर्भूत’ कसे होतात हेही कोडेच. याचबरोबर हेही खरे की भाजपचे निवडणूक तंत्र एवढे प्रभावी आहे की विरोधकांना त्यांच्या पासंगाला पुरे पडता येत नाही. मोदी-शहा हे 24 तास राजकारण करणारे आहेत. जळी-स्थळी-का÷ाr-पाषाणी त्यांना राजकारण दिसते. ते विरोधकांची सारी अंडीपिल्ली बाहेर काढतात. त्यात दयामाया नाही. ’त्यांना स्वतःचे मुसळ दिसत नाही पण दुसऱयाचे कुसळ दिसते’ हे विरोधकांचे आरोप कधीकधी गैरलागू वाटत नाहीत. निवडणूक आयोगाने वारंवार खुलासा करूनदेखील ईव्हीएमचा गैरवापर करून भाजपचा फायदा केला जात आहे असे दावे होत आहेत ते किती खरे किती खोटे हे काळच दाखवेल. इलेक्टोरल बॉण्ड म्हणजे सत्ताधाऱयांना मिळालेला ब्लँक चेक आहे असे देखील सांगितले जात आहे. बंगालच्या निवडणुकीत भाजपने इतक्मया प्रचंड प्रमाणात साधने एकजूट केली आहेत की अशी रेलचेल असलेली निवडणूक कधीच बघितली नव्हती असे जुने जाणकार सांगत आहेत. कफल्लक बंगालला काहीही करून जिंकायचे आणि विरोधकांची नांगी मोडायची असा जणू विडाच भाजपने उचलल्याने ही निवडणूक कळीची बनली आहे.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा असले तरी बंगालमधील निवडणूक ही माजी अध्यक्ष असलेले शहा यांच्यासाठी सर्वात प्रतिष्ठेची आहे कारण गेली काही वर्षे ते जातीने या राज्याकडे लक्ष देत आहेत. ज्या प्रचंड तयारीने भाजप या निवडणुकीच्या रणकंदनात उतरली आहे त्याने देशातील पक्षाच्या साऱया विरोधकांची पाचावर धारण झाली नसती तरच नवल होते. ‘ममतादीदी आज जात्यात असतील तर आपण सुपात आहोत आज नाहीतर उद्या भरडले जाणार. आता भाजपाला वेळीच रोखले नाही तर आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होईल’ अशी भीती छोटय़ा-बडय़ा सर्व पक्षांना वाटत आहे.
ममतांनी केलेल्या या आवाहनाला एक वेगळा अर्थदेखील आहे. जे आत्तापर्यंत सोनिया गांधी आणि शरद पवारांना जमले नाही अथवा त्यांनी जे केले नाही ते काम करायला आपण निघालेलो आहोत असा एक अलिखित संदेश दीदींनी दिलेला आहे. राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा मोदी-शहा यांचा प्रमुख विरोधक म्हणून बनवली असली तरी ममतादीदींना राजकारणातील ते एक ‘जुनिअर’च वाटतात. ज्यावेळी ममतांनी काँग्रेसमध्ये सोनिया आणि पवार यांच्या हाताखाली काम केले होते तेव्हा राहुल यांचा राजकारणात जन्मदेखील झाला नव्हता. ‘मोदी-शहा यांना शिंगावर घेण्याचे धाडस बंगालच्या या वाघिणीने केलेले आहे. आता आरपारची लढाई सुरू झाली आहे’ असे ममतादीदींना सांगायचे आहे. भाजपअंतर्गत देखील बंगालच्या या तुफान मोहिमेकडे अतिशय कुतूहलाने बघितले जात आहे.
मोदी-शहा यांची पक्षावर असलेली पकड त्यांनी निवडणूक लढाई वेळोवेळी फत्ते केली म्हणून आहे. म्हणूनच बंगालची चढाई कितपत यशस्वी ठरणार याकडे पक्षातील त्यांचे सुप्त विरोधक लक्ष ठेवून आहेत. गेल्या 6 वर्षात मोदी-शहा यांनी आपल्या ‘होयबांची’ सोय सरकार आणि पक्षात लावली आहे आणि राज्यातील प्रस्थापित नेत्यांना निष्प्रभ करण्याचे खेळ चालवले आहेत. एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना जेरीला आणणे सुरू आहे तर दुसरीकडे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना एकटे पाडले जात आहे. नितीन गडकरी आणि राजनाथसिंग यांना त्यांच्या गृहराज्यातील राजकारणात फारसे स्थान नाही हे एक उघड गुपित आहे.
‘जो अगोदरच गर्तेत असतो असतो त्याला पडायची भीती नसते’ अशा स्वरूपाची इंग्रजीमध्ये म्हण आहे. सध्या विरोधी पक्षांना हे म्हणणे तंतोतंत लागू आहे. मोदी-शहा यांनी त्यांना पळता भुई थोडी केली आहे. बंगालमध्ये भाजप आला तर त्याचे ‘मिशन महाराष्ट्र’ सुरू होईल आणि महाविकास आघाडीत बिघाडी होईल अशी भाकिते राजधानीच्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहेत. ममतांनी थोडक्मयात भाजपला रोखले तर त्यांना मदत करायला काँग्रेस आणि डावेदेखील पुढे येतील आणि बंगालमध्ये एक नवीन प्रयोग सुरू होईल अशी कुजबुज आहे.
सुनील गाताडे