लंडनच्या म्युझियममध्ये ठेवला जाणार
ब्रिटनमध्ये फेब्रुवारी महिन्यात आकाशातून एक असा दगड पडला आहे, ज्याची किंमत कोटय़वधी रुपयांची असल्याचे मानले जात आहे. पण हा दगड याहूनही अधिक विशेष आहे. आकाशातून कोसळताना हा दगड कॅमेऱयात कैद झाला होता. हा दगड आता लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.
ब्रिटनच्या ग्लॉस्टरशायरमध्ये फेब्रुवारीमध्ये उल्कापिंडाचा एक तुकडा कोसळला होता, हा तुकडा कोसळताना एका व्यक्तीने पाहिले होते. आकाशातून खाली येत असताना हा तुकडा नारिंगी आणि हिरव्या रंगातील आगीच्या गोळय़ाप्रमाणे भासत होता.
हा उल्कापिंड सुमारे 4 अब्ज वर्षे जुना आहे. ब्रिटनमध्ये मागील 30 वर्षांमध्ये आढळलेला हा पहिलाच उल्कापिंड आहे. याच्या मदतीने अंतराळात जीवसृष्टीची किती शक्यता आहे हे समजून घेण्यास मदत होऊ शकते. या तुकडय़ाला ‘विन्चचोम्बे मेटेईओरीटे’ नाव देण्यात आले आहे. हा अत्यंत दुर्लभ प्रकारचा उल्कापिंड आहे. याला कार्बनेशियस कोंड्राइटचा एक प्रकार म्हटले जात आहे. काही तज्ञ आता या तुकडय़ाचे अध्ययन करत आहेत.









