एसकेई सोसायटी आयोजित प्रदर्शनाचा हेरवाडकर हायस्कूल मैदानावर बक्षीस वितरण समारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या आकाशकंदील प्रदर्शनाचा सांगता सोहळा व बक्षीस वितरण समारंभ नुकताच हेरवाडकर हायस्कूलच्या मैदानात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य फडके, प्राध्यापक देसाई, प्रा. किरण हणमशेठ, ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतूरकर, स्वाध्याय विद्यामंदिर हायस्कूलचे सहशिक्षक दळवाई उपस्थित होते.
प्रारंभी भंडारी स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य फडके यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थितांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱयांचा गुलाबपुष्प देऊन व मानधन देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेतील सर्व सहभागींना बक्षिसे
या प्रदर्शनात सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शालेय विभागातील प्रथम क्रमांकाला 1000 रु., द्वितीय क्रमांकासाठी 700 रु. व तृतीय क्रमांकाला 500 रु. व उत्तेजनार्थ 20 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 200 रुपये मानधन देण्यात आले. शालेय गटातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 150 रुपये देण्यात आले. महाविद्यालयीन गटासाठी प्रथम क्रमांक 3000 रु., द्वितीय क्रमांक 2000 रु. व तृतीय 1000 रु. तर उत्तेजनार्थ एकूण 16 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपये देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 300 रुपये देण्यात आले.
विजेते पुढीलप्रमाणे, शालेय गट-
1) आदित्य पाटील, 2) मानसी जाधव, 3) सुजल माने सर्व ठळकवाडी स्कूलमधील आहेत. महाविद्यालयीन गट विजेते पुढीलप्रमाणे- 1) मीनल हणमशेठ, 2) यमुना पिंगट, 3) श्रुती करणे, सर्वजण जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट शिनोळीमधील आहेत. वरील सर्व बक्षिसे रोख रकमेच्या स्वरुपात लोकमान्य सोसायटीच्यावतीने पुरस्कृत करण्यात आली होती. सर्व विजेत्यांना व्यासपीठावरील उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
भविष्यात अनेक उपक्रम राबविणार
कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांमध्ये जी मरगळ आली होती, ती झटकून टाकण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची विद्यार्थी व शिक्षकांना निश्चितच मदत होईल. भविष्यात असे अनेक उपक्रम एस.के.ई. सोसायटी व लोकमान्यच्या माध्यमातून राबविले जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतूरकर, सहशिक्षक सी. वाय. पाटील, स्वाध्याय विद्या मंदिरचे सहशिक्षक पवन पाटील यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले.