जिल्हय़ात संताप वाढू लागला, पॉझेटिव्हीटीचा फेर आढावा घ्या, अन् तातडीने किराणा सुरू करा
दीपक प्रभावळकर, सातारा
सातारा जिल्हा प्रशासनाने खुलासा करण्याचा प्रयत्न केला असला तरी कोरोना अपडेट घोटाळय़ासंदर्भातील आकडेवारी आजही पारदर्शक नाही. त्यामुळे गेल्या सात दिवसांतील मूळ आकडेवारी आणि पॉझिटीव्हीटी रेट उघड करा आणि कडकच्या नावाखाली बांधून घातलेल्या सातारा जिल्हय़ाला किमान शिथीलता द्या. किराणा माल आणि भाजीपाला किमान दोन तासांसाठी तरी सुरु झालाच पाहिजे, अशी ‘तरुण भारत’च्या करवी जोरदार मागणी होवू लागली आहे. आकडेवारीचा घोळ न उलघडण्याने जिल्हय़ात संताप व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हय़ात कोरोना अहवाल अपलोड न केल्यामुळे झालेल्या घोटाळय़ाचा हडकंप सलग दुसऱया दिवशीही कायम होता. संतापाच्या प्रतिक्रिया उमटणे सुरुच आहे. जिल्हा प्रशासन नक्की प्रलंबित अहवाल किती राहिले व गेल्या काही दिवसांत दैनंदिन नक्की किती टेस्ट केल्या जात आहेत असे दोन आकडे देण्यात बुधवारीही प्रशासनाला अपयश आले.
सातारा जिल्हा तीन आठवडय़ांपासून लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे जनतेच्या संतापाचा आलेख वाढू लागला आहे. साऱया जगाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्हय़ात बाधितांचा आकडा साताऱयाच्या दुप्पट असूनही शिथिलता मिळाली. बुधवारी आलेल्या आयसीएमआरच्या आकडेवारीत सातारा जिल्हय़ाचा आकडा मुंबईच्या दुप्पट, नागपूरच्या पाच पट ठरला आहे. कोरोना आल्यापासून पहिल्यांदाच सातारचा आकडा पुण्यापेक्षा जास्त आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱया लाटेचा डाऊनफॉल येत असताना साताऱयाची आकडेवारी संदिग्ध असल्याबाबत जनतेचाही ठाम विश्वास झाला आहे.
पॉझिटीव्हीटीचा फेरआढावा घ्या
राज्यात केवळ साताराच डाऊनफॉल न आलेला जिल्हा असल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी गेल्या पाच दिवसांतील ‘मूळ’ पॉझिटीव्हीटीचा फेरआढावा घेऊन सातारा जिल्हय़ाला शिथीलता देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
भाजीपाला, किराणाला दोन तास द्या
सामान्य आणि गोरगरिब जनतेचे अत्यंत हाल सुरु आहेत. वर्षभरात बेरोजगारी, बुडालेला व्यवसाय आणि हातावर पोट असलेले लोक चोर मार्गाने बाहेर पडून भाजीपाला आणि किराणा आणत आहेत. कडकच्या नावाखाली गोरगरिब जनतेला चोर वाटा धरायला लावू नका. किमान शुक्रवारपासून तरी राज्यातील अन्य 20 जिल्हय़ाच्या धरतीवर सकाळी 7 ते 9 भाजीपाला आणि किराणा आणण्याची जनतेला मुभा द्यावी, ही मागणी हजारो लोकांनी ‘तरुण भारत’कडे विविध मार्गांनी केली आहे.
सातारचा शेतकरी आणि जेफ बेझॉसमध्ये फरक आहे का?
(खरेतर हीच हेडलाईन व्हायला हवी होती!)
कडकच्या पहिल्या आठवडय़ात घरपोच सुविधा सुद्धा बंद करण्यात आली होती. मंगळवारी भाजीपाला घरपोच दिला तर चालेल असे सांगण्यात आले असले तरी व्यावहारिकदृष्टय़ा ते पूर्णतः असफल ठरले आहे. साताऱयातला सामान्य शेतकरी आणि ऍमेझॉनचा मालक जेफ बेझॉस यांच्यात जिल्हा प्रशासनाने फरक करावा कारण सध्या जिल्हय़ात ऍमेझॉन आणि स्नॅपडीलसारख्या कंपनीच्या घरपोच सुविधा आहेत. जी सूट जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेझॉसला मिळते ती सूट सातारच्या सामान्य शेतकऱयाला मिळत नाही, हे ही जिल्हय़ाचे दुदैव वाटते.
‘तरुण भारत’चे वृत्त अन् मुक्तीचा झाला उच्चांक
कोरोना मुक्तीचा संदर्भ हा गेल्या 10 ते 14 दिवसांपूर्वी बाधित झालेल्यांच्या आकडय़ाशी सलंग्न असतो हे संख्याशास्त्र साऱया जगभरात ठाऊक आहे. त्याप्रमाणे गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वी बाधितांचा टेंड 1,800 ते 2,200 असा होता. म्हणजे याप्रमाणातच बुधवारी कोरोना मुक्ती येणे अपेक्षित होते. मात्र बुधवारी कोरोनामुक्तीचा गेल्या वर्षातील अचंबित करणारा उच्चांक झाला आहे. बुधवारी 5,107 रुग्णांना कोरोना मुक्त जाहीर करण्यात आले. यामुळे उपचारार्थ रुग्णांची संख्या 17 हजाराच्या खाली येणार आहे. बुधवारी जिल्हय़ात ऑक्सिजन बेड व्याप्त असल्याची संख्याही 60 टक्क्यापर्यंत खाली आल्याचे सुचिन्ह आहे. मुक्तीचा उच्चांक अन् दोन दिवसांचे ‘तरुण भारत’चे वृत्तांकन असाही वाचकांकडून योगायोग जोडला जात आहे.
लोकप्रतिनिधींनी होम क्वॉरंटाईन झालेत काय?
सातारा जिल्हय़ावरील लॉकडाऊन वाढल्यामुळे सामान्य जनता पूर्णतः मेटाकुटीला आलेली आहे. यातून शिथीलता मिळावी म्हणून जनता आक्रोश करत असताना लॉकडाऊनच्या आडून लोकप्रतिनिधी होम क्वॉरंटाईन झालेत की अशी जळजळीत प्रतिक्रिया लोकांनी ‘तरुण भारत’जवळ व्यक्त केली. जिल्हा दुसऱया लाटेत होरपळत असताना आयसोलेशन सेंटर कमी पडत होते. रुग्णांना बेड मिळत नव्हते. आता डाऊनफॉल आलाय, आकडे कमी होताहेत तेंव्हा आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन करणाऱया लोकप्रतिनिधींना काय म्हणावे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह ‘ऑन दि फिल्ड’ जिल्हा दौऱयावर
कोरोना अपलोड घोटाळा हा पूर्णतः लॅब चालकांच्या बेजबाबदार आणि अत्यंत संतापजनक कारभारामुळे घडला आहे. जिल्हा प्रमुख म्हणून साऱयांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे बोट दाखवणे गैर नसले तरी मंगळवारपासून शेखर सिंह यांनी सर्वाधिक पेंडेन्सी राहिलेल्या तालुक्यांना भेटी देण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. मंगळवारी फलटण तालुक्याच्या दौऱयानंतर बुधवारी त्यांनी माण आणि खटाव तालुक्यांचा अत्यंत बारकाईने आढावा घेतला आहे. या उशिरा का होईना झालेल्या दौऱयामुळे येत्या दोन दिवसांत पेंडेन्सी संपून मूळ आकडे मिळायला सुरुवात होईल. दरम्यान, पॉझिटीव्हीटी रेट कमी होवून जिल्हा खुला करण्यासाठी रॅट टेस्टिंग मोठय़ा वेगाने वाढवण्याची गरज असून शेखर सिंह यांनी त्याकडे लक्ष वेधावे.
Previous Articleदेशाला लवकरच मिळणार स्वदेशी लस; सरकारकडून 30 कोटी डोस बुक
Next Article ‘आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा’
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.