कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनवर मार्ग काढण्यासाठी पुढाकार, अन्य ऍथलिटस्कडूनही आग्रही भूमिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना व्हायरसमुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांची परवड होत असून क्रीडापटूही त्याला फारसे अपवाद नाहीत. भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिच्यासह काही महिला ऍथलिट एनआयएस पतियाळात सराव करत आहेत. मात्र, बाहेर जाण्याची परवानगी नसल्याने त्यांचा प्रवास एनआयस कॅम्पसमध्येच सुरु असून आपल्याला आऊटसाईड ट्रेनिंगची परवानगी द्यावी, अशी मागणी हिमाने केली आहे.
सध्या एनआयएस पतियाळात माझ्यासारखे बरेच ऍथलिट आहेत. आमचा इनडोअर सराव सुरु आहे. पण, त्यावर बऱयाच मर्यादा येत आहेत. त्यामुळे आम्हाला आऊटडोअर ट्रेनिंगची परवानगी द्यावी. आम्ही बाहेरही एकत्रित धावणार नाही. एक जण प्रथम धावण्याचा सराव करुन येईल, त्यानंतर दुसरा जाईल. याप्रमाणे आम्ही सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळू, अशी ग्वाही हिमाने यावेळी दिली.
राष्ट्रीय ऍथलेटिक्सचे प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी हिमाच्या या मागणीला समर्थन दर्शवले असून मंत्रालयाकडून एक किंवा दोन दिवसात याबाबत उत्तर अपेक्षित आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हिमासह
तिच्या अन्य सहकाऱयांनी याबाबत क्रीडा मंत्रालयाकडे लेखी मागणी केली आहे. छोटय़ा छोटय़ा
गटातून किमान एक ते दोन तास आऊटडोअर ट्रेनिंगची परवानगी द्यावी, असे म्हटले आहे. राधाकृष्ण
नायर यांनी पतियाळातून ही माहिती
दिली.
नायर यांना होकार अपेक्षित
‘येथील एनआयएस केंद्रावर अन्य कोणाचीही ये-जा नसल्याने येथे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. त्यामुळे, जे ऍथलिट सध्या केंद्रावर आहेत, त्यांना परवानगी देण्यास काहीही हरकत नाही’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. एनआयएस केंद्रावर सध्या 41 ऍथलिट आहेत आणि हॉस्टेलपासून ट्रक अँड फिल्ड एरिया फक्त 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वरील सर्व ऍथलिट एका वेळी 8 जणांचा गट करतील आणि एक गट एकावेळी एक किंवा दोन तास सराव करेल, अशी हिमा व तिच्या सहकाऱयांची योजना आहे.
गटाने सरावाची योजना
‘सर्व 41 ऍथलिट एकाच वेळी अजिबात धावणार नाहीत. उलटपक्षी गट करुन ते धावण्याचा सराव करतील. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यावर व सुरक्षित राहण्यावरच सर्वस्वी भर असेल. कारण आऊटडोअर ट्रेनिंगशिवाय, काहीही साध्य होऊ शकणार नाही. लॉकडाऊनपर्यंत अजिबात सराव केला नाही तर सर्व परिस्थिती सुधारल्यानंतर सर्व ऍथलिटला नव्याने सुरुवात करावी लागेल आणि यात बराच वेळ जाऊ शकतो’, असे राधाकृष्ण यांनी याप्रसंगी नमूद केले.
‘ऍथलेटिक्स खूप वेगळे आहे. काही क्रीडा प्रकारात ऍथलिटस्ना अतिशय छोटी जागा पुरते. ते त्यात सराव करु शकतात. भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी यांचा यात समावेश होतो तर मॅरेथॉन, दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीसाठी छोटी जागा पुरत नाही. याचा सरावही आऊटडोअर करावा लागतो. 2018 पासून येथील एनआयएसवर तीन शिफ्टमध्ये सातत्याने सराव सुरु आहे आणि त्यात खंड पडून चालणार नाही’, असे राधाकृष्ण नायर यांनी याप्रसंगी तपशीलवार बोलताना सांगितले. लॉकडाऊनच्या कालावधीत वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढू नये, यासाठी ऍथलिटनी आपल्या आहारावर लक्ष पुरवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. सध्या ऍथलिटना आऊटडोअर ट्रेनिंग नसल्याने त्यांचे वजन वाढू शकते, असा नायर यांचा होरा आहे. आपल्या रुममध्ये किंवा कॉरिडॉरमध्ये हलकेफुलके व्यायाम, कसरत करण्यावर भर द्यावा, अशी त्यांची या ऍथलिटना सूचना आहे.
केटी इरफानचा बेंगळूरमध्ये सराव
ऑलिम्पिकमधील 20 किलोमीटर्स चालण्याच्या शर्यतीसाठी पात्रता संपादन केलेल्या रेसवाकर केटी इरफानचा सध्या बेंगळुरातील साई केंद्रावर सराव सुरु आहे. याचवेळी 3 हजार मीटर्स स्टीपलचेस इव्हेंटसाठी पात्रता मिळवलेल्या अविनाश साबळेचा उटीत सराव सुरु आहे. बेंगळूर व उटीमध्ये जे आहेत, ते लॉकडाऊनमुळे बाहेर सराव करत नाहीत, त्यांचा सराव इनडोअर सुरु आहे, अशी माहिती राधाकृष्ण नायर यांनी याप्रसंगी दिली.
नीरज चोप्रा पतियाळा केंद्रावरच राहणार
स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा स्वयंप्रेरणेने लादून गेलेल्या क्वॉरन्टाईनमुळे हा 14 दिवसांचा कालावधी होईतोवर एनआयएस पतियाळा केंद्रावरच थांबणार आहे. त्याचा क्वारन्टाईन कालावधी बुधवारपर्यंत आहे. ‘नीरज दि. 18 मार्च रोजी तुर्कीहून परतला आणि त्याचे विलगीकरण दि. 1 एप्रिल रोजी संपते. तो तोवर कुठेही जाऊ शकणार नाही. तो एनआयएस पतियाळा केंद्रावरच थांबेल’, असेही नायर यांनी येथे स्पष्ट केले.









