यावर्षीही शाळेचा प्रारंभ ऑनलाईन शिक्षणानेच : नव्याच्या नवलाईला मुले मुकणार : अनेक मुलांचा हिरमोड
अजय कांडर / कणकवली:
गेल्यावर्षी मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून नेहमीच मुलांच्या किलबिलाटाने गजबणाऱया शाळा बंद आहेत. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याची शक्यताच कमी आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले शाळेतील भावविश्वाला मुकत आहेत. शाळेतील गमती जमती व प्रत्यक्ष शिक्षण अनुभण्यासाठी मुले उत्सुक आहेत. पण, मुलांनी शाळेत जाण्याचा हट्ट धरला तरी कोरोनाच्या दुसऱया लाटेत त्यांना ऑनलाईन शिक्षणानेच शाळेच्या नव्या वर्षाचा प्रारंभ करावा लागणार आहे. त्यामुळे नवा वर्ग, नवे कपडे, नवी पुस्तके सार काही प्रत्यक्ष अनुभवता येता येणार नसल्याने मुलांचा हिरमोड झाला आहे.
जून महिना आला की मुलांच्या शाळेच्या प्रारंभीच्या दिवसाची लगबग सुरू होते. नवा वर्ग, नवी पुस्तके, नवे कपडे, नवे मित्र हे सगळं प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मुलांचं मन आसुसलेलं असतं. परंतु या आनंदाला मागील वर्षी मुले पारखी झाली. आता कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव आधीच्या लाटेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे यावर्षीही जून महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यताच मावळली असून शाळेच्या पहिल्या दिवसाला मुले मुकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य असल्याचे अनेक मुलांशी आणि पालकांशी चर्चा केल्यावर दिसून आले.
शाळेची घंटाही सुनीसुनी
शाळेत जाणे, शाळेची घंटा वाजणे आणि शाळेच्या घंटेच्या आवाजाबरोबर वर्गात जाणे किंवा वर्गाच्या बाहेर पडणे हे फील मुलांसाठी काही आगळेच असते. मात्र, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे शाळेची घंटा सलग वाजलीच नाही. आणि यावर्षी सुद्धा ही घंटा वाजण्याची शक्यता नसल्याने शाळेच्या घंटेचा आवाज आता मुलांच्या कानी एवढय़ात तरी घुमणार नाही.
मुलं घडविणाऱया शाळा झाल्या अबोल
मुलं शिकतात, मोठी होतात, उच्च शिक्षण घेतल्यावर चांगल्या नोकरीला लागतात. मात्र, या सगळ्य़ा शिक्षण प्रवासात सगळ्य़ात लक्षात राहतात त्या प्राथमिक शाळेतल्या रम्य आठवणी. कारण ते बालवय असते. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची उत्सुकता असते. समाज म्हणून त्यांच्या वयाची मुलं त्यांच्याबरोबर खेळत असतात. एक नवी दोस्ती होते. जग समजून घेण्याची प्रक्रिया तिथूनच सुरू होते. मात्र, बालवाडी, पहिली ते चौथीपर्यंत हे भावविश्व अधिक मुलांचे घडत जात असले तरी कोरोनामुळे प्राथमिक शाळेचे शिक्षणही मुलांना ऑनलाईन घ्यावे लागले असल्यामुळे या सगळय़ा भावविश्वापासून मुलं दूर राहणार असल्याची खंत मुलांबरोबर पालक आणि शिक्षकांनाही आता सतावते आहे.
शाळेचा पहिला दिवस अनेक मुलांना मुकणार
2020 मार्चला कोरोना विषाणूने साऱया जगाला हादरून सोडले. सारे जग जागच्या जागी थांबून माणसं घरातच लॉकडाऊन झाली. सगळे व्यवसाय ठप्प झाले, मोठा आर्थिक फटका सगळ्य़ांनाच बसला. अगदी शिक्षण विभागालाही बसला. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वच मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यातही
प्रथमच वर्गात पाऊल टाकणाऱया त्या बोबडय़ा निरागस जीवांना शाळा म्हणजे काय असते हेच अनुभवायला मिळाले नाही.
प्रारंभिक शिक्षणाचा प्रवास होतोय खंडित
शिक्षणाची सुरुवात मुळाक्षरांपासून होत असते. म्हणजे ‘अ आ इ ई’ पासून ते ‘ज्ञ’ पर्यंतच्या शिक्षणाचा हा प्रारंभीचा प्रवास असतो. हा प्रारंभीचा शिक्षण प्रवास गेल्या वर्षभरात खंडित झाला आहे. त्यातून शिक्षणाचे खरे भावविश्व मुले हरवून बसली आहेत. एखाद्या गावात मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक शाळा असते. अर्ध्या- अर्ध्या मैलावरून मुले शाळेत येतात. या सर्वच शाळा मुलांच्या किलबिलाटाने नेहमीच गजबलेल्या असतात. सध्या हा किलबिलाटही नाही, शाळेच्या आवारात घुमणारा घंटेचा आवाजही नाही. शाळेच्या आवारात कमालीचा शुकशुकाट आहे.
मुलांचे भावविश्व कोरोनामुळे संकटात
एक विषाणू येतो आणि सारे जग बदलून जातं. शिक्षणाची दिशाच बदलते. शाळेत मुलं गेल्यामुळे पुस्तकांचा लळा मुलांना लागलेला असतो. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्या पुस्तकांच्या पानांचा वास मुलांना हवाहवासा वाटतो. नव्या पुस्तकांची पाने परतताना अक्षरावरून नजर फिरताना त्यातील चित्रे मुलांना आकर्षित करतात. पुढे पुढे शाळेच्या दिवसाची सवय होते. प्रारंभीच्या दिवसानंतर जोरदार पावसाळा सुरू होतो. आणि मग कधीतरी सुट्टी मिळून घरी थांबूया, पावसात थोडे भिजूया असेही मुलांना वाटते. तेव्हा मुलांच्या मनात येते ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?’ परंतु आता शाळाच बंद राहणार असल्यामुळे अशा स्वप्नांपासून मुलं कोसो मैल दूर गेली असून यातून त्यांचे शाळेतील बालपणच हरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे! orts_spdy”:true}},{“p5-pahgphjyjxpva-szlewujhjaaq2tcx-487451-i1-v6exp3.v4.metric.gstatic.com:443”:{“supports_spdy”:true}},{“p5-pahgphjyjxpva-szlew









