गोडोली / प्रतिनिधी :
गुरुवारी रात्री 8 ची वेळ… गडद अंधारात गोडोली तळ्याच्या पाण्यात जीवाच्या आकांताने कोणी तरी हात हलवताना पोलीस नाईक लक्ष्मण दगडे यांनी पाहिले… चौकीतील सहकारी मच्छिंद्र जाधव, तुषार सुर्यवंशी यांना आवाज दिला… क्षणार्धात पाण्यात उडी घेतली… बुडणाऱ्या महिलेला पकडले, मात्र बाहेर पडताना मोठी अडचण निर्माण झाली.. त्यावेळी अन्य दोघांनीही हाताची साखळी करत मदत केल्याने पराकष्ठाने ते काठावर आले.. दरम्यान गर्दीपाहून मदतीसाठी सरसावत डॉ. सुरज मुल्ला यांनी प्रसंगावधान ओळखून केलेली मदत जीवदान देणारी ठरली…त्यांनी प्राथमिक उपचार करत धीर देताच ती महिला बोलू लागली.
अधिक चौकशी केली असता, संबंधित महिलेने मानसिक आजार बरा होत नाही, औषधांचा खर्च परवडत नसल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रडत रडत सांगितले. तर घरात थकलेले सासू सासरे,अपंग पती आणि छोटा मुलगा असल्याची माहिती दिली. आपल्या जाबाज कर्मचाऱ्यांची कामगिरी समजताच पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी कौतुक केले तर याप्रसंगीने घाबरलेल्या डोळ्यात अश्रू अनावर झालेला त्या महिलेचा छोटा मुलगा अभिषेक याने एक फुलांचा बुके देत पोलीस नाईक लक्ष्मण दगडे यांना, ‘माझ्या आईचे प्राण वाचवले, थँक्स पोलीस काका,’ असे बोलून कृतज्ञता व्यक्त केली.









