ब्रह्मेशानंद स्वामीजींचा आशिर्वचनपर उद्गार तपोभूमिवर विघ्नहर्ताअनुष्ठान : देशविदेशांतून एक हजार यजमानांचा ऑनलाईन सहभाग
प्रतिनिधी / फोंडा
गणपती म्हणजे साक्षात आत्मा. ‘एकमेवद्वितीयकम् ब्रह्म’ अशा या महागणपतीचे भाद्रपदातील चतुर्थीला हिंदू धर्मात पुजन केले जाते. हिंदू धर्म हा सनतान वैदिक धर्म असल्याने अंतरंगात प्रवेश करणे हा सनातनीयांचा धर्म आहे. आईमुळेच श्री गणेश प्रथम पुजनीय आहे. हिंदू धर्मीय श्रेष्ठ असल्याने नराचा नारायण होऊ शकतो, हे आपल्या धर्माने सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये देवाशी एकरुप होण्याचा संकेत आहे, असे आशीर्वचनपर मार्गदर्शन कुंडई येथील तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले.

श्रीगणेश चतुर्थीच्यानिमित्ताने तपोभूमीवर करुणामयी मातृशक्तीद्वारे विघ्नहर्त्याला साकडे व जगत्जननीद्वारे विघ्नहर्ता अनुष्ठान करण्यात आले. यावेळी ऑनलाईन माध्यमातून स्वामीजी भक्तगणांना संबोधित होते.
स्वामीजी पुढे म्हणाले, सर्व घटकांचा विचार विवेकाने केलेला आहे. ज्यांनी आपल्याला संस्कृती, उत्सव दिले आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला त्या ऋषिमुनींची ही भूमी आहे. ऋषी आणि कृषी हे आपले आदर्श आहेत.
विविध राष्ट्रांतील यजमानांचा ऑनलाईन सहभाग
या अनुष्ठानात भारतासह दुबई, अमेरिका, लंडन, कॅनडा, इटली, रोम आदी विविध देशातील तीन हजारांहून अधिक यजमान ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाला मनशांती, यशप्राप्ती, उत्तम आरोग्य, धनप्राप्ती, ज्ञानप्राप्ती, मनोकामनापूर्ती व दिर्घायुष्य लाभावे हे या अनुष्ठानचे प्रयोजन होते.
पहिल्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आदी विधी पार पडले. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशविदेशातून सहभागी झालेले मुख्य यजमान, विशेष यजमान, महापूजा यजमान, मोदक दाता, ब्रह्मभोजन दाता, विद्यार्थी, संकल्प यजमान अशा सर्व यजमानांनी अनुष्ठान संकल्प, कलशस्थिती गणेश पूजन ऑनलाईन माध्यमातून केले.
दुसऱया दिवशी विघ्नहर्ता अनुष्ठान, महापूर्णाहूती, अग्नीनारायण प्रार्थना, मार्जन, तथा तर्पण विधी सर्व यजमानाच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. स्वामीजींच्या हस्ते पूर्णाहूती झाल्यानंतर आशीर्वाद, महाआरत्या व वैश्विक प्रार्थनेने अनुष्ठानाची सांगता झाली.
कोरोनावरील उपचारांना यशप्राप्तीसाठी प्रार्थना करा
ब्राह्मीदेवी म्हणाल्या, विघ्नहर्ता गणपती आनंदाचे दान भक्तांच्या ओंजळीत टाकत असतो. त्यामुळे त्याला देवादीदेव समजले जाते. यावर्षी जगतजननी माता – भगीनीना आव्हानात्मक सेवा ब्रह्माशानंद स्वामीजींच्या कृपने प्राप्त झाली. संपूर्ण जगात थैमान घालणाऱया कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी वर्तमान स्थितीत सर्वाना आपल्या घरात बसून विघ्नहर्त्याला विनवणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी युद्धपातळीवर जगभर प्रयत्न सुरु आहेत. या सर्व प्रयत्नांना यशप्राप्ती लाभावी यासाठी आपण प्रार्थना करू, असेही त्या म्हणाल्या.
ऑनलाईन गणेश पुजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चतुर्थीच्या काळात गणपती पूजनासाठी पुरोहितांना घरोघरी जाण्यास मर्यादा असल्याने तपोभूमीच्या माध्यमातून सुरु केलेल्या ऑनलाईन शास्त्रोक्त गणपती पूजेला उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. चतुर्थीच्या दिवशी फेसबूकच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात एक हजाराहून अधिक भाविकांनी गणपतीची घरोघरी विधीवत पूजा बांधली.









