अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचा केला खून
आष्टा / वार्ताहर
प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात संबंधित पत्नी व तिच्या प्रियकरावर खूनाचा तसेच प्रेताची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने वाळवा आणि शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे, राहणार माळभाग वाळवा यांनी आष्टा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीची पत्नी प्राची सुशांत वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील, राहणार बिळाशी, ता. शिराळा यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत सुशांत वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. 27 जून 2021 रोजी प्राची वाजे ही मुलगा मनन सह घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. ती अमरसिंह पाटील यांच्या मुंबई येथील घरी वास्तव्यास गेली होती. यावेळी अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला होता. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली.
मनन हा मुंबई येथे मयत झाला असताना अमरसिंह पाटील व प्राची यांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र करुन मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याचे खोटी माहिती दिली. मनन याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना वाकुर्डे येथे त्याच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करुन प्रेताची विल्हेवाट लावली होती. वाळवा येथे याबाबतचे निनावी पत्र सुशांत वाजे यांना आल्याने संबंधित घटनेची पूर्ण माहिती घेवून संशयित पत्नी प्राची व तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.