खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे नावे केले 90 लाख रुपये
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
81 वर्षीय आईकडील दागदागिने व तिच्या नावावर असलेली लाखोची रोकड मिळविण्यासाठी मुलानेच रचला कट. त्यासाठी त्याने आपल्याच नात्यातील लोकांची मदत घेतली. प्रसंगी आईला लाथाबुक्क्यांचा प्रसाद देऊन अंगावरील दागिने लुटणाऱ्या मुलासह त्याला मदत करणाऱया सहाजणांविरुध्द आईने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भंगरेव्वा महादेव बागदुरे (वय 81, रा. नरेंद्रनगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. राजशेखर महादेव बागदुरे (वय 58) हा मुलगा, राजश्री बागदुरे (वय 51) व शारदा बागदुरे (वय 42) या सुना आहेत, तर राकेश उर्फ सिध्देश्वर बागदुरे (वय 30, रा. उत्तर कसबा, सोलापूर) हा नातू व राकेशचा मित्र माशाळ व मेव्हणा शिवानंद नागणसुरे हे साथीदार आहेत.
शहरातील उमासा नागरी पतसंस्थेत फिर्यादी यांच्या ठेवी आहेत. त्यामध्ये 70 लाख रुपये होते. तसेच जोड खातेही तेथेच आहे. त्यामध्ये 20 लाख रुपये होते. ही रक्कम हडपण्यासाठी आरोपींनी संगनमत केले. त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र पतसंस्थेत सादर केले. त्याआधारे फिर्यादीच्या ठेवीतील 70 व 20 असे एकूण 90 लाख रुपये आरोपी मुलगा राजशेखर याने पत्नी राजश्री व वहिनी शारदा यांच्या नावावर ट्रान्सफर करुन घेतले.
दरम्यान, उत्तर कसबा येथील घरात असलेल्या तिजोरीतील 150 तोळे सोने आरोपींनी काढून घेतले. 25 ऑगस्ट 2020 रोजी मुलगा राजशेखर व राजश्री व शारदा तसेच राकेश यांनी फिर्यादीला मारहाण केली. जखमी अवस्थेत असतानाच, आरोपींनी फिर्यादीच्या अंगावरील 18 तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. त्याचबरोबर इतर मौल्यवान वस्तू आणि खतावणीसह महत्वाची कागदपत्रे काढून घेतली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
संपत्ती मिळवण्यासाठी काय पण मुलगा राजशेखर याने आईकडील संपत्ती मिळविण्यासाठी पत्नी राजश्री, वहिनी शारदा, मुलगा राकेश आणि मेव्हणा शिवानंद नागणसुरे यांची मदत घेतली. संगनमत करुन आरोपींनी मागील सहा महिन्यांपासून हा प्रयत्न सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. |