800 वर्षांनी जागृत ज्वालामुखी पाहण्यासाठी मोठी गर्दी
वाहनांची 4 किलोमीटर लांब लागली रांग
फोटोशूट करवून घेत आहेत लोक
युरोपीय देश आइसलँडमध्ये 800 वर्षांनी झालेला ज्वालामुखी विस्फोट पाहण्यासाठी मोठय़ा संख्येत लोक गर्दी करत आहेत. लोक वाहन घेऊन ज्वालामुखीच्या परिसरात पोहोचत आहेत. 1150 अंश सेल्सिअस तापमानावर उकळत असलेल्या लाव्हारसानजीक लोक फोटोशूट करवून घेत आहेत. सायकलिंग आणि स्टंट करत आहेत.

19 मार्च रोजी ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 50 हजार लोक हे दृश्य पाहण्यासाठी पोहोचल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. ज्वालामुखीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर 4 किलोमीटर लांबीची वाहनांची रांग लागली आहे. लोकांची वाढती संख्या पाहता सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मागील काही आठवडय़ांमध्ये आइसलँडमध्ये भूकंपाचे हजारो धक्के जाणवले होते. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने इशारा दिला होता. पण ज्वालामुखी नागरी वस्तीपासून खूपच दूर आहे. याचमुळे सध्या कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीची भीती नाही. पण लोकांना घराच्या खिडक्या बंद ठेवण्याचा आणि घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता.









