प्रतिनिधी /म्हापसा
शिवोली मतदार संघातील आंसगांव पंचायतीच्या उप-सरपंचपदी सौ. रिया राजेश नाईक (प्रभाग क्रमांक 3 ) यांची मंगळवारी सकाळी पंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, एकुण सात सदस्य संख्या आणी एक नियुक्त पंच सदस्य असलेल्या या पंचायतीचे यापुर्वीचे उप-सरपंच कार्तीक केळकर यांनी ठरल्या करारानुसार महिन्याभरापुर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बार्देशच्या गट विकास अधिकार्यांकडे सादर केल्याने सदरचे पद रिक्त झाले होते. आंसगांव पंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत नाईक हे सध्या विराजमान आहेत. दरम्यान, पंच सदस्य क्षिरसागर नाईक तसेच कार्तीक केळकर यांनी आंसगांव पंचायतीचे सरपंचपद यशस्वीपणे सांभाळलेले आहे. मंगळवारी सकाळी पंचायतीच्या विशेष कक्षात नवीन उपसरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत रिया नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची सर्वानुमते या पदासाठी निवड करण्यात आली. यावेळी बार्देश गट विकास कार्यालयातील मनोहर पवार यांनी बैठकीत निर्वाचन अधिकारी या नात्याने काम पाहिले. दरम्यान, आंसगावच्या उप-सरपंचपदी महिला पंच सदस्याची निवड करण्यात आल्याने पंचक्रोशीतील महिलांसाठी तसेच त्यांना सरकारी योजनांचा फायदा करून देण्यासाठी पंचायत मंडळ तसेच सरपंच हनुमंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्यरत राहाणार असल्याचे सौ. रिया राजेश नाईक यांनी दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले, त्यांचप्रमाणे आंसगाव पंचक्रोशीला नेहमीच सतावणार्या पिण्याच्या पाण्याची समस्या आणी गेली तीन वर्षे रखडून पडलेल्या एकमेव क्रिडांगणाचा विषय आपण प्रामुख्याने घेत सरपंच हनुमंत नाईक यांच्या सहकार्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सौ. नाईक यांनी शेवटी सांगितले.









