- लॉकडाऊन काळात चिंतेत पडलेल्या सिंधुदुर्गातील छोटय़ा शेतकऱयांच्या आंब्याला मार्केट
- तळेरेचे डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि सांगलीचे डॉ.विकास आडमुठे यांची कामगिरी
- रोख पैसे देऊन खरेदी केला दीड हजार पेटी आंबा
- सामान्य शेतकऱयांना मिळाला मुंबईपेक्षाही जास्त दर
- शेतकरी नेते राजू शेट्टींनी केले उपक्रमाचे कौतुक
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोरोनाच्या या विश्वव्यापी संकटात शेती, व्यापार, उद्योग मोडकळीस आला असतांना अशा वेळी एकमेकांना सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी आता प्रत्येकाने पुढे आले पाहिजे व आपल्या क्षमतेचा वापर स्वत:बरोबरच समाजासाठी देखील केला पाहिजे. सिंधुदुर्गातील तळेरे येथील डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या ओळखींचा वापर करत पश्चिम महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या माध्यमांतून मणचे, मुटाट, गोवळ, पाळेकरवाडी व पाडगांव इत्यादी गावांतील छोटय़ा शेतकऱयांच्या 1 हजार आंबा पेटय़ांची विक्री करुन देत या सामान्य शेतकऱयांना आंबा नुकसानीपासून वाचवले. व समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला. एक रुपयाचेही कमिशन न घेता माणुसकीच्या भावनेतून त्यांनी ही कामगिरी केली हे विशेष होय.
यावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे अगोदरच आंबा पीक अतिशय कमी आल्याने शेतकरी हवालदील झाला होता. त्यात कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झालं आणि छोटय़ा आंबा उत्पादक शेतकऱयांसाठी मुंबई मार्केटचे दरवाजे बंद झाले. तयार झालेला आंबा विकायचा कसा हा प्रश्न सर्वांसमोरच निर्माण झाला. आंबा विक्री नाही झाली तर दलालांकडून खत, फवारण्यांसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे याची च्ंिाता सताऊ लागली. गावागावांतील सर्व सामान्य शेतकरी फार निराश झाले. तरेळे गावात वैद्यकीय व्यवसाय करणाऱया डॉ.मिलिंद कुलकर्णींकडे असाच एक शेतकरी तब्यत ढासळल्याने उपचारासाठी आला. डॉ.कुलकर्णी यांनी त्याच्याकडे सहज म्हणून आंबा पिकाची चौकशी केली. त्यावेळी त्या शेतकऱयाने आपली व्यथा त्यांच्याकडे व्यक्त केली. आंबा असूनही तो विकता येत नसल्याने कर्जफासात अडकून आत्महत्या करायची वेळ आली असल्याचे तो म्हणाला. आपल्या सारखे आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक छोटे शेतकरी डोकीवर हात घेऊन बसल्याचे त्याने सांगितले.
डॉ.कुलकर्णी यांनी घेतला शेतकऱयांसाठी पुढाकार
त्या छोटय़ा आंबा उत्पादक शेतकऱयाची ती व्यथा ऐकून डॉ.कुलकर्णी व्यतिथ झाले. त्यांनी या गरिब शेतकऱयांना या संकटातून सोडवता येईल का, याचा विचार सुरु केला. हा विचार करत असतांना त्यांना कल्पना सुचली. मुंबई मार्केट बंद असलं म्हणून काय झालं, पश्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील आपले अनेक डॉक्टर्स मित्र आहेत. त्यांना जर हा उत्तम दर्जाचा देवगड हापूस विकत घ्यायला सांगितला तर ते निश्चितपणे घेतील व त्यांना वाजवी दरात उत्कृष्ट प्रतिच्या देवगड हापूसची चव चाखता येईल व येथील शेतकऱयांना मुंबई मार्केट पेक्षा चांगला दरही मिळेल. डॉ.कुलकर्णी यांनी सांगली येथील आपले मित्र डॉ.विकास आडमुठे यांच्याशी संपर्क साधला व येथील शेतकऱयांची क्यथा त्यांच्या कानावर घातली. डॉ.आडमुठे हे पेशाने वैद्यकीय व्यावसाईक असले तरी ते राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिंधुदुर्गातील शेतकऱयांचे हे दु:ख जाणलं आणि त्वरित मदतीसाठी होकार दर्शविला. तयंनी या कामी शिरवळ येथील ‘शिरवळ प्रतिष्ठान’या संस्थेची मदत घेतली. त्यानंतर सांगली, विटे, बारामती, शिरवळ येथील सर्व डॉक्टरांशी संपर्क साधून प्रत्येकाने एकतरी आंबा पेटी खरेदी करावी असे आवाहन केले. डॉ.विजय शिंदे, डॉ.सुधिर पाटील, डॉ.देशमुख, डॉ.गोपिचंद अशा अनेक डॉक्टर्सनी या उपक्रमाला माणूसकीच्या भावनेतून सहकार्य केले व आंबा पेटय़ांची ऑर्डर दिली. पश्चिम महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद येताच डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी मणचे, मुटाट, गोवळ, पाडगांव, पाळेकरवाडी इत्यादी गावांतील शेतकऱयांना याची कल्पना दिली. जवळपास 40 ते 45 शेतकरी आंबा देण्यास तयार झाले. डॉक्टरांचे देवगड येथील मित्र रवी पाळेकर हा आंबा पश्चिम महाराष्ट्रात इच्छित स्थळी पोहचवण्यास तयार झाले.
शासनाकडून रितसर परवानग्या घेण्यात आल्या लॉकडाऊन मधील सर्व सोपस्कार पूर्ण करत पहिल्यांदा 150 पेटय़ा आंबा सांगली येथे पाठविण्यात आला. आंब्याच्या पेटय़ा घेऊन सांगलीत दाखल झालेल्या या वाहनाचं स्वागत दस्तुरखुद्द शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. ‘पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी कोकणातील शेतकऱयांच्या मदतीला धावला, हे ऐकून खूप बरे वाटले’ अशी
प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली व या आंबा विक्रीचा शुभारंभही केला. रोख 2 हजार रुपये या दराने दिडशे पेटी आंबा एका दिवसात विक्री झाला. आणि त्यानंतर पुढील काही दिवसात वरिल गावांतील तब्बल 1 हजार पेटी आंबा रोख पैसे देऊन या पश्चिम महाराष्ट्रातील डॉक्टरांनी विकत घेतला. अजून 500 पेटी आंब्याची ऑर्डरही मिळाली. सगळा ट्रान्स्पोर्टचा खर्च वगळता शेतकऱयाला एक पेटीचे जवळपास 1500 ते 1600 रुपये मिळाले. जे मुंबईतील दरापेक्षा 500 ते 600 रुपयांनी अधीक होते. पैसे रोखीत मिळाले. शेतकरी आनंदीत झाला. ट्रान्सपोर्टवाल्यालाही चांगले पैसे मिळाले. पश्चिम महाराष्ट्रातील डॉक्टरांना देवगड हापूसची चव चाखता आली.
त्यांनी यांचे आंबे विकले – यांनी त्यांची द्राक्षे विकली
आपण अडचणीत आलेल्या कोकणातील शेतकऱयांचे आंबे विकून दिले आता कोकणातील शेतकऱयांनी कोकणात आमची द्राक्षे विकून आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा शेतीशी संबंधीत असलेल्या तेथील डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यास
प्रतिसाद देत वाहतूकदार पाळेकर यांनी तेथील अडचणीत आलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱयांकडून द्राक्षाच्या पेटय़ा आणून त्या सिंधुदुर्गाचे विकत त्या शेतकऱयांना द्राक्षांचे पैसे मिळवून दिले. अशा पद्धतीने डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी एका नव्या अध्यायाची सुरुवात करत सिंधुदुर्गवासीयांसमोर एक नवा आदर्श घालून दिला. पेशाने वैद्यकीय व्यावसायिक असून देखील कुलकर्णी यांनी माणूसकीचे दर्शन घडवत शेतकऱयांना जे सहकार्य केले, याचा आदर्श समाजातील प्रत्येकाने घेत एकमेकांना मदतीचा हात दिला तर या कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक आरिष्ठातून आपण सहजपणे बाहेर पडू शकतो.









