संबंधितांवर कारवाई करणार! : दिवाळीपूर्वी सर्व रस्त्यांची स्वच्छता- ऍड. परिमल नाईक
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेकडून दररोज कचरा उचलला जातो. तो कचरा नगरपालिकेच्या कचरा डेपोत जमा करण्यात येत आहे. असे असताना काही नागरिक घरातील व दुकानातील कचरा शहराचे सौंदर्यात बाधा पोहचेल, अशा पद्धतीने रस्त्यावर टाकत आहे. शहरातून जाणाऱया आंबोली मार्गावर उपरलकर देवस्थानजवळ रस्त्यालगत कचरा, बिअरच्या बाटल्या भरलेली पोती टाकून जणू काही कचरा डेपोच केला आहे. त्यामुळे हा परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरुन कोल्हापूर, बेळगाव आदी भागातील पर्यटक सावंतवाडी शहरात येत असल्याने या कचऱयामुळे शहराचे सौंदर्याला बाधा पोहचत आहे. काही हाकेच्या अंतरावरच शहराचे जागृत उपरलकर देवस्थान आहे. या ठिकाणी मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. कचऱयाच्या दुर्गंधीमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेने सदर ठिकाणी कचरा टाकण्यास बंदी आणावी. तसेच कचरा टाकण्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
काही दिवसापासून मच्छी विक्रीची वाहने थांबवून सदर ठिकाणी मच्छीविक्री व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे मच्छीचे पाणी तेथे पडून दुर्गंधी पसरली आहे. कचऱयाबरोबरच तेथे दारुच्या बाटल्यांही पिशवीत भरून टाकल्या जात आहेत. तसेच घराचे सामान, माती, दगड, लाकडे टाकण्यात आल्याने ही जागा कचरा डेपोच बनला आहे. याबाबत सावंतवाडी न. प.चे आरोग्य सभापती ऍड. परिमल नाईक म्हणाले की, कचरा रस्त्यावर टाकणाऱयाचा शोध घेण्यात येत असून त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी शहरातील सर्व रस्ते साफ करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर बसणाऱया मासेविक्रेत्यांना हटविण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.








