वार्ताहर / आंबोली:
आंबोली मुख्य धबधब्याच्या ठिकाणी मंगळवारी भलामोठा दगड घरंगळत येऊन रेलिंगवर अडकला. सांयकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. कोरोनामुळे धबधब्यावर शुकशुकाट असल्याने मोठा अनर्थ टळला. दगड कोसळल्याने धबधब्यावर जाणे धोक्याचे बनले आहे. तसेच सदर प्रकारामुळे घाटातून वाहतूक करणेही धोकादायक झाले आहे. प्रशासनाने याबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
आंबोली घाटात 2009 मध्ये दरड कोसळली होती. सलग दोन वर्षे दरड कोसळल्याने आंबोलीचे पर्यटन ठप्प झाले होते. त्यानंतरही कोसळणाऱया दरडीची भीती आंबोली पर्यटनावर राहिली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना केल्याने दरड कोसळण्याची भीती कमी झाली. परंतु दगड पडण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. गतवर्षीही धबधब्याजवळ दगड कोसळून कारवर आदळला होता. यात कारचे मोठे नुकसान झाले होते. काहीवेळा धबधब्यावर आंघोळ करणाऱया पर्यटकांवरही दगड कोसळून जखमी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी खबरदारी घेण्यात येत होती. यंदा कोरोनामुळे आंबोलीचे वर्षा पर्यटन बंद आहे. कोसळणाऱया दगडांमुळे घाटातून वाहतूक करणाऱया वाहन चालकांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे घाटातून सावध राहून वाहतूक करणे गरजेचे आहे.









