पोलीस अधीक्षकांचे वेधले लक्ष : कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी / ओरोस:
आंबोली पोलीस स्थानकात सर्वसामान्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंबोली येथील कृष्णा पाखरे, गणपत पाटील, लक्ष्मण गावडे, यशवंत सावंत यांनी केला आहे. पोलिसांच्या या भूमिकेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 20 पर्यंत न्याय न मिळाल्यास 21 डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
आंबोली जकातवाडी येथील आपल्या घराकडे जाणारा रस्ता अडवला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील जमीन विषय सरकारकडे प्रलंबित असताना काहीजणांकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करून दहशत निर्माण केली जात आहे. आंबोली पोलीस याबाबतची तक्रार घेत नाहीत, याकडे त्यांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले आहे. जमिनीबाबतच्या तक्रार अर्जावरील सुनावणीवेळी आपल्याला काहीजणांकडून मारहाणही करण्यात आली. उपचारानंतर याबाबत सावंतवाडी पोलिसात देण्यात आलेल्या अर्जाचीही अद्याप दखल घेण्यात आली नाही. दरम्यान आंबोली गावात दहशत निर्माण करणाऱया संबंधितांवर आणि तक्रार न घेणाऱया पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.








