निर्णय राऊत यांचा आगळावेगळा उपक्रम : आजपासून प्रारंभ : 2.35 लाख पर्यटकांची आगावू नोंदणी
विजय राऊत / सिंधुदुर्ग:
कोरोनामुळे आंबोलीपासून दुरावलेल्या निसर्गपेमी पर्यटकांना घरबसल्या आंबोलीची ‘लाईव्ह सफर’ घडवून आणण्यासाठी ‘आंबोली टुरिझम’ या संस्थेमार्फत ‘आंबोली टुरिझम लाईव्ह’ या अभिनव उपक्रमास उद्या, दि. 8 जुलैपासून प्रारंभ होत आहे. निर्णय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत आपल्या पसंतीनुसार आंबोलीतील विविध पर्यटन स्थळांची ‘लाईव्ह अनुभुती’ आपणास घरबसल्या घेता येणार आहे. या अभिनव उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 2 लाख 35 हजाराहून अधिक पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केली आहे.
‘ऑनलाईन लाईव्ह पर्यटन’ ही नवी कन्सेप्ट प्रथमच महाराष्ट्र टुरिझममध्ये राबवण्यात येत असून, ती पहिल्यांदा राबवण्याचा मान आंबोलीला मिळाला आहे. या आगळय़ा-वेगळय़ा उपक्रमांतर्गत ‘आंबोली टुरिझम लाईव्ह’च्या संकेत स्थळावरून ज्या स्थळासाठी जास्त नोंदणी होईल, ते स्थळ सर्वप्रथम अगदी लाईव्ह स्वरुपात पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे. कोरोनाच्या भीतीने घरात अडकून पडलेल्या पर्यटकांना ही एक दुर्मिळ संधी घरबसल्या उपलब्ध होणार असल्याचे निर्णय राऊत यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ‘आंबोली’ हे ठिकाण आता जगभर प्रसिद्ध आहे. तसेच येथील आंबोली घाट मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांना एकत्रित जोडणारा ऐतिहासिक असा राज्यमार्ग आहे. आंबोली हे पर्यटनस्थळ काही वर्षांपूर्वी फक्त ‘वर्षा पर्यटना’साठी राज्यात ओळखले जायचे. वर्षा पर्यटन हंगामातील तीन महिने येथे पर्यटन चालायचे. पर्यटन हे रोजगाराचे साधन आहे. परंतु, आंबोलीत मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, नांगरतास धबधबा, सनसेट पॉईंट, शिरगावकर पॉईंट, राघवेश्वर पॉईंट एवढेच पाहण्यासाठी उपलब्ध होते. मात्र, निसर्ग पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंबोली येथील निर्णय राऊत यांनी हे पर्यटन 12 महिने सुरू राहण्यासाठी, ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून आंबोली पर्यटनस्थळाला जगभर पोहोचवले. तसेच बारा महिने पर्यटनाकरिता येथे अभ्यासपूर्वक विविध योजना तथा संकल्पना राबवल्या. यात सर्व प्रथम सुरुवात साहसी पर्यटनचाही पाया त्याने रोवला. साहसी पर्यटन ऍक्टिव्हिटिज, इको टुरिझम, व्हिलेज टुरिझम, कृषी पर्यटन (ऍग्रो टुरिझम), साईटसिन, पर्यटन माहिती केंद्र, टेंट कॅम्पिंग, योगा, मेडिटेशन, पंचकर्मा, बाराही महिने नेचर कॅम्प, बर्ड-बटरफ्लॉय वॉचिंग, जंगल सफारी, नाईट सफर, जंगल टेक, ऍनिमल वॉचिंग, नेचर टेक, पठार टेक, रॉक टेक (बेसिक व हार्ड), बायोडायव्हर्सिटी कॅम्प, स्टडी-रिसर्च कॅम्प, टेंट कॅम्पिंग, जंगल टेंट, लेक साईट टेंट, जंगलातील व शेतातील जंगल माची (निगराणी माळा), कॅम्प फायर, फोटोग्राफी कॅम्प, बैलगाडी सफर, घोडागाडी सफर (चित्रि), जीप सफर, ट्रक्टर सफर, मातीच्या घरातील अनुभव, मालवणी घरगुती चुलीवरचे जेवण, त्यासोबत गाईड सर्व्हिस, हॉटेल बूकिंग, घरगुती जेवण, होम स्टे, कार सर्व्हिस आणि आंबोली टू अदर प्लेस टूर व अदर प्लेस टू आंबोली तसेच हिडेन प्लेस आंबोली – चौकुळ – गेळे – कुंभवडे – खडपडे परिसरातील पर्यटनस्थळे एक्सप्लोर करणे, कॉर्पोरेट नेचर कॉन्फरन्स, इव्हेंटस व आदी बारा महिने उपलब्ध आहेत.
असे असेल आंबोली पर्यटन लाईव्ह
असंख्य पर्यटकांच्या मागणीमुळे आंबोली टुरिझममार्फत ऑनलाईन सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तथा आंबोली टुरिझम अधिकृत वेब पोर्टलवर आंबोलीतील नयनरम्य निसर्ग, विशेषतः मनमोहक घनदाट धुके, पावसाळय़ातील फेसळणारा आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र (नदी उगम), महादेवगड पॉईंट, आंबोली घाट, कावळेसाद पॉईंट हे मुख्यतः लाईव्ह तसेच चौकुळ व्हिलेज (पठारे), बाबा धबधबा (कुंभवडे) व आदी हिडन पॉईंट हेही लाखो पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच रात्रीच्या अंधारातील आंबोलीचे विश्वदेखील पाहता येणार आहे. सोबत रात्रीच्या किर्रर्र अंधारातील जीवांचा आवाज आदी. तर यात आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र (नदी उगम), महादेवगड पॉईंट-आंबोली घाट, कावळेसाद पॉईंट हे मुख्यतः लाईव्ह स्ट्रिमिंग केले जातील, तर चौकुळ, कुंभवडे परिसरातील पर्यटनस्थळे नियोजनानुसार प्रक्षेपित होणार आहेत. तसेच आंबोली परिसरातील आजवर प्रसिद्धीस न आलेल्या अनेक बाबीसुद्धा सर्वांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सोबत आंबोली, चौकुळ तथा गेळे परिसरातील मूळ स्थानिकांचे कल्चर, कलागुण, वैध, आपत्कालीन प्रशिक्षण, नेचर प्रोग्राम्स, जीवन शैली, मेडिटेशन हेही लाखो लोकांना पाहायला मिळणार आहेत.
सहा महिन्यात अडीच लाख पर्यटकांची नोंदणी
‘आंबोली टुरिझम’कडून ‘आंबोली पर्यटन लाईव्ह’ पाहण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत सुमारे 2 लाख 35 हजारांहून जास्त पर्यटकांनी नोंदणी केली आहे. यावेळी पर्यटकांना आपल्या इच्छेनुसार आंबोलीतील त्यांच्या आवडीचीही पर्यटनस्थळ लाईव्ह स्वरुपात पाहता येणार आहे, हे विशेष. असा उपक्रम तथा संकल्पना पहिल्यांदाच राबवली जात आहे. 8 जुलैपासून ‘आंबोली टुरिझम लाईव्ह’ पाहता येणार आहे. तर सध्या मिळत असलेला प्रतिसाद पाहता आंबोली टुरिझम लाईव्ह’चा आनंद विक्रमी लाखो पर्यटक घेण्याचा अनुमान वर्तविण्यात येत आहे.









