वार्ताहर / आंबोली:
आंबोली-चौकुळ या प्रमुख जिल्हा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रेडियम कॅट आय बसविण्याची मागणी चौकुळ ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्राr यांनी निवेदनाद्वारे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली. यावेळी त्यांच्यासोबत चौकुळ शाखाप्रमुख रुपेश गावडे होते.
आंबोली-चौकुळ हा मुख्य रस्ता घनदाट जंगलातून जातो. तसेच हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग स्वरुपाचा असून हा रस्ता पुढे तेरवण, हंसापूर (चंदगड) येथे जातो आणि पुढे केगदवाडी येथूनही हा रस्ता कुंभवडे, तळकटमार्गेही दोडामार्ग तालुक्यात जातो. आंबोली तसेच चौकुळ पंचक्रोशीत सद्यस्थितीत ग्रामीण पर्यटन वाढत असल्याने या रस्त्याने पर्यटकांची सतत ये-जा सुरू असते. पावसाळय़ात या भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडत असतो. संपूर्ण पावसाळी मोसमात हा रस्ता दाट धुक्याने दिसेनासा होतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनधारकांना व प्रामुख्याने पर्यटकांना व ग्रामस्थांना धुक्यामुळे पुढील रस्ताही दिसत नाही.
प्रामुख्याने आंबोली ते शिरगाव पॉईंटपर्यतचा हा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता राखीव जंगलातून जात असून सदर रस्त्यावर जंगली जनावरांचा वावर मोठय़ा प्रमाणावर असतो. अस्वल, गवारेडे रस्त्यावर येण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वाहने चालवणे कठीण होते. यापूर्वीही या रस्त्यावर दाट धुक्यामुळे छोटे-मोठे अपघात घडले आहेत. भविष्यातील अनुचित प्रसंग टाळण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने रेडियम कॅट आय बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.









