ट्रकचालक बचावला, किरकोळ दुखापत
वार्ताहर / आंबोली:
आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या वरील बाजूला माणगाव ते बेळगाव असे जळावू लाकडे भरून जाणाऱया ट्रकला समोरून येणाऱया वाहनाने हूल दिल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रक घाटात 50 फूट खोल जाऊन पडला. या अपघातात चालकाच्या डोक्याला दुखापत झाली. हा अपघात मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
ही घटना समजताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, पोलीस नाईक राजेश गवस यांनी घटना स्थळी जाऊन जखमी चालक विजय यशवंत मार्शेलकर (50, रा.झाराप) यांना ताबडतोब 108 रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चालक विजय मार्शेलकर हे प्रकाश मोर्ये यांच्या मालकीचा लाकूड भरलेला ट्रक घेऊन माणगाव ते बेळगाव जात असताना घाटात धबधब्याच्या वरील बाजूला वाहनाने हूल दिल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रक खोल दरीत कोसळला.









