वाळपई / प्रतिनिधी
तालुक्मयातील आंबेली गावात एका कुळागारात 12 फूट लांबीचा किंग कोब्रा पकडून त्याला जीवदान देण्याचा प्रकार घडला. यामुळे सदर भागातील नागरिकांचा जीव भांडय़ात पडला. याबाबतची माहिती अशी की आंबेली येथील एका कुळागाराध्ये किंग कोब्रा असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र विनोद सावंत यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर किंग कोब्रा शिताफीने पकडला. सकाळपासून सदर किंग कोब्रा या बागायतीमध्ये फिरत होता. यामुळे बागायतदार मालक व नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. यासंदर्भात याची माहिती मिळताच त्यांनी सदर किंग कोब्रा पकडण्यात यश प्राप्त केले .
दरम्यान या संदर्भात विनोद सावंत यांनी बोलताना सांगितले की सदर किंग कोब्रा 12 फूट लांबीचा होता. त्याला पकडून म्हादई अभयारण्यात सोडण्यात आले आहे .आतापर्यंत आपण अशा प्रकारचे अनेक किंग कोब्रा पकडून त्याला जीवदान दिले आहे. पकडण्यात आलेला किंग कोब्रा हा 12 फूट लांबीचा होता. यासंदर्भाची माहिती बागायत मालकाकडून प्राप्त झाल्यानंतर सदर ठिकाणी घटनास्थळी धाव घेऊन त्याला पकडण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.









