विसावा पॉईंटनजीकची दुर्घटना, मृत कोल्हापूरचा रहिवासी,
साखरपा/ वार्ताहर
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात विसावा पाईंट नजीक घाटाचा कठडा तोडून सुमारे 300 फुट खोल दरीत स्विफ्ट कार कोसळली. या भीषण अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली संजय गणेश जोशी (63, राजारामपूरी, कोल्हापूर) असे मृत कारचालकाचे नाव आहे.
जोशी हे स्विफ्ट कारने कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती समजताच साखरपा दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. देवरुख पोलीस, साखरपा पोलीस व राजू काकडे हेल्प ऍकॅडमी यांनी आंबा येथील स्थानिक तरुणांच्या सहकार्याने अतिशय धोकादायक असलेले रेस्क्यु ऑपरेशन केले आणि महत्प्रयासाने गाडीत अडकलेला मृतदेह दरीतून वर काढला. चालकाचा मृतदेह विच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरु होते. मृताचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित होते.
देवरुख पोलिस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.विद्या पाटील, सचिन भुजबळराव, संदीप जाधव, हेमा गोतवडे, अपर्णा दुधाने, राहुल गायकवाड, किशोर जोयशी, वाहतुक शाखा एपिआय अमरसिंग पाटील आदी कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते.









