राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विभागाकडून परिपत्रक जारी
प्रतिनिधी/ रत्नािगरी
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरील साखरपा ते आंबा या घाट भागात मुसळधार पावसामुळे बारा ठिकाणी दरड कोसळून महामार्ग पूर्णपणे बंद झाला होता. सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी परिपत्रक काढून सहाचाकी वाहतूक व एसटी सेवा पूर्ववत चालू करण्यात आल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
जुलै महिन्यात दरड कोसळून आंबा घाट वाहतुकीस बंद झाला होता. दरड कोसळलेल्या भागातील माती हटवून 5 दिवसातच घाटातून हलक्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली होती. परंतु अवजड वाहतूक दीर्घकाळ बंद होती. मोठय़ा वहनांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत होता. यात इंधन, वेळ, पैशाचा मोठा अपव्यय होत होता. यामुळे प्रवासी, अवजड वाहतूकदार, शेतकरी, लाकूड व्यापारी, चिरेखाण व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत होता.
त्यानुसार आंबा घाट लवकर चालू करण्याच्या अनुषंगाने 29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9.30 वा. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत आंबा घाटाच्या चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला होता.
आंबा घाटातून जाण्यासाठी सहाचाकी वाहनाचे मालासह एकूण वजन जास्तीत-जास्त 20 टन किंवा त्यापेक्षा कमी असावे, अशा सूचना अधिकाऱयांना दिल्या होत्या. त्यानुसार युध्द पातळीवर कामही सुरु करण्यात आले होते. बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी परिपत्रक काढून सहाचाकी वाहतूक व एसटी सेवा पूर्ववत चालू करण्यात आली आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे.









