आंध्र प्रदेश/प्रतिनिधी
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या बस-ट्रक भीषण अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान मिनी बसमधून चित्तूर जिल्ह्याकडून हैदराबादच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला जोराची धडक दिली.
प्राथमिक अंदाजानुसार चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. बस आधी डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडर तोडून बस ट्रकवर जाऊन आदळली. बस आणि ट्रकचा वेग प्रचंड असल्यानं या भयंकर अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.