ऑनलाईन टीम / हैदराबाद :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आंध्र प्रदेश सरकारने देखील राज्यात अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने एक ट्विट करत माहिती दिली.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 5 मे पासून आंशिक लॉकडाऊन लावले जाणार आहे. यापूर्वी कोविडची वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन 11 वी आणि 12 वीची परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे. आता परीक्षांच्या तारखा कोरोनाची परिस्थिती सामान्य झाली की जाहीर केल्या जाणार आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 23, 930 रुग्ण हे एकट्या आंध्र प्रदेशातील आहेत.
दरम्यान, राज्यात सद्य स्थितीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 11 लाख 45 हजार पेक्षा अधिक आहे. तर 1,43,178 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 1,836 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.









