ऑनलाईन टीम / हैदराबाद :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आंध्र प्रदेश सरकारने राज्यात सुरू असलेला कोरोना कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरो ना परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी आज एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची मुख्यमंत्री कार्यालयाने एक ट्विट करत माहिती दिली.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी राज्यात 5 मे ते 18 मे पर्यंत आंशिक लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज 31 मे पर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या काळात सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठान सुरू असतील. तसेच आवश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने 12 वाजल्यानंतर बंद असणार आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशात मागील 24 तासात 21 हजार 171 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 21, 101 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात सद्य स्थितीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 35 हजार 491 वर पोहोचली आहे. यातील 12,15, 683 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 2,10,436 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 9,372 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.









