तेदेप अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंकडून लक्ष्य : 3 राजधान्यांवरून राजकीय संघर्ष, हजारो कोटींची गुंतवणूक धोक्यात
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशच्या राजधानीच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यात राजकीय संघर्ष उभा ठाकला आहे. राज्याच्या विधानसभेने सोमवारी तीन राजधान्यांच्या निर्मिती विषयक विधेयकाला मंजुरी दिली आहे. नव्या विधेयकाच्या अंतर्गत अमरावती, विशाखापट्टणम, कुर्नूल यांना राजधानीचा दर्जा प्राप्त झाला आहे. जगनमोहन यांच्या या निर्णयाला चंद्राबाबूंनी ‘तुघलकी फर्मान’ ठरविले आहे. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा तुघलक अधिक समजंस होता, असे उद्गार चंद्राबाबूंनी काढले आहेत.
विकेंद्रीकरणाचा अर्थ राजधान्यांना तीन तुकडय़ांमध्ये विभागले जावे आणि राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात एक राजधानी निर्माण केली जावी, असा होत नाही. तुघलकाचे राज्य याहून अधिक चांगले होते. मुख्यमंत्री कुठे राहतील आणि विशाखापट्टणम येथे दुसरे निवासस्थान निर्माण करणार का असे प्रश्न नायडू यांनी उपस्थित केले आहेत.
तुघलकाची राजधानी
मोहम्मद बिन तुघलकाने 1327 मध्ये राजधानी दिल्लीहून दक्षिणेच्या दौलताबादमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात तुघलकाचे राज्य गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात होते. तुघलकाच्या या निर्णयाचे गंभीर परिणाम झाले होते. तसेच त्याचा हा प्रयोग फसल्याने नाराजांनी बंडखोरी केली होती. या सर्व घडामोडींदरम्यान महामारी फैलावल्याने स्वतः तुघलकही आजारी पडला होता. या स्थितीत तुघलकाने दिल्लीत परतण्याचे पाऊल उचलले होते.
अमरावतीत नाराजी
जगनमोहन यांच्या निर्णयावर टीका होत असली तरीही कुर्नूलमध्ये उच्च न्यायालय स्थापन करण्यात येणार असल्याने तेथे समर्थन मिळत आहे. विशाखापट्टणम अणि उत्तर किनारी भागातील लोकही या घोषणेमुळे आनंदी आहेत. पण अमरावतीत शेतकरी तसेच अन्य गटांनी निदर्शने केली आहेत.
कम्मा-रेड्डी संघर्ष
एनटीआर यांच्या राजकारणातील उदयापूर्वी रेड्डी समुदायाचे राज्यात प्रभुत्व होते आणि त्यांच्याकडेच काँग्रेस पक्षाचे नियंत्रण होते. एनटीआर यांच्या उदयानंतर आंध्रप्रदेशात कम्मा जातीच्या नेत्यांनी रेड्डी समुदायाला मागे टाकत सत्ता प्राप्त केली होती. कम्मा आणि रेड्डी यांचे आंध्रच्या गावांमध्ये परस्परविरोधी गट होते. तर तेलंगणात कम्मा यांची संख्या तुलनेने कमी होती. अशा स्थितीत एनटीआरचा प्रवेश आणि त्यांच्या आंध्रविषयक धोरणांमुळे तेलंगणातील लोका बाजूला पडले होते.
नायडूंचे आवाहन
राज्याची राजधानी अमरावती येथून हटविली जाऊ नये, असे आवाहन चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. मुख्य राजधानीचा दर्जा गमाविल्यास अमरावतीमधील सुमारे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली जाईल आणि याचा शेतकऱयांना फटका बसणार आहे. राजधानीचा प्रकल्प प्रगतिपथावर असताना हा निर्णय घेणे चुकीचे आहे. 50 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे राज्यात 50 हजार नोकऱयांची निर्मिती होणार आहे. रुग्णालये, शैक्षणिक केंद्रांसह सुमारे 130 संस्था उभ्या राहणार आहेत. राजधानीत बदल झाल्यास हे प्रत्यक्षात उतरणार नसल्याचे चंद्राबाबूंनी म्हटले आहे.









