केंद्र सरकारकडून कठोर सुरक्षा व्यवस्था
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा शेतकरी आंदोलक संघटनांनी दिला आहे. भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकायत यांनी ही माहिती दिली. तीन्ही कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. आंदोलनस्थनी कडेकोट सुरक्षा आहे.
दिल्ली पोलीस आयुक्तांनी सुरक्षेचा आढावा मंगळवारी घेतला. अनेक आंदोलक शेतकऱयांनी पोलिसांनी उभे केलेले अडथळे ओलांडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला, असेही सांगण्यात आले.
दिल्ली सीमेवर सुरक्षा भिंती
दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांनजीक असणाऱया महामार्गांवर बॅरिकेडस्चे जाळे उभे केले आहे. तसेच भक्कम भिंती उभ्या केल्या आहेत. आंदोलकांना ठिय्या देता येऊ नये, म्हणून जमिनीत मोठे खिळे बसविले आहेत. गणतंत्र दिनी दिल्लीत आंदोलक शेतकऱयांनी ट्रक्टर मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांपैकी अनेकांनी दिल्लीत हैदोस घालत हिंसाचार केला होता. लाल किल्ल्यावर अन्य ध्वज लावून तिरंगी ध्वजाचा त्यांनी अपमान केला, असा आरोप करण्यात आला होता. या हिंसाचारामुळे आता आंदोलनस्थळी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱयांचे जाळे
दिल्लीच्या सीमांवर तसेच गाझीपूर सीमारेषेवर सीसीटीव्ही कॅमेऱयांचे जाळे बसविण्यात आले आहे. आंदोलनात शिरलेल्या देशविरोधी शक्तींच्या हालचाली टिपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आंदोलनाचा ताबा आता समाजकंटकांकडे गेल्याचा आरोप होत आहे. या प़ार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सावध असून गणतंत्र दिनासारखी घटना घडू नये म्हणून दक्षता घेत आहेत.
सरकारची चर्चेची तयारी
आजही आंदोलकांशी चर्चा करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. शेतकऱयांना ज्या सुधारणा हव्या आहेत त्या त्यांनी सुचवाव्यात. त्यांच्यावर खुल्या वातावरणात चर्चा करण्यात येईल. तथापि, कायदे मागे घेण्याची मागणी अनाठायी आहे, असे सरकारकडून पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे. नवे कृषी कायदे शेतकऱयांच्या हिताचेच असून काळजीपूर्वक तयार केलेले आहेत, असे पुन्हा स्पष्ट केले गेले.
संजय राऊत आंदोलकांना भेटले
आंदोलक शेतकऱयांना महाराष्ट्र सरकारचा व शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकायत यांची भेट घेऊन काही काळ चर्चा केली. महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र सरकार शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्याचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. शिवसेना आंदोलकांना एकटे पडू देणार नाही, असे ते म्हणाले.









