सर्वोच्च न्यायालयाचा दिशादर्शक निर्णय : शाहीन बागमधील आंदोलनासंबंधीच्या याचिकांवर खंडपीठाचा निकाल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोणत्याही निर्णयाचा व घटनेचा निषेध करण्यासाठी अथवा आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करताना दीर्घकाळ सार्वजनिक ठिकाणांचा वापर करता येणार नाही. आंदोलन-निदर्शनांसाठी सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांचाच वापर केला पाहिजे, असा दिशादर्शक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ‘मतभेद आणि लोकशाही यांची हातात हात घालूनच वाटचाल होत असते,’ अशी व्यापक टिप्पणीही खंडपीठाने या सुनावणीवेळी व्यक्त केली आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे दीर्घकाळ सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्याच्या प्रशासनाच्या कार्यवाहीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांची न्या. एस के कौल, अनिरुद्ध बोस आणि कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या याचिकांवरील राखून ठेवलेला निकाल खंडपीठाने बुधवारी जाहीर केला.
सीएएविरोधात दिल्लीत शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा गटाकडून सार्वजनिक ठिकाणी आंदोलन-निदर्शनांसाठी ठाण मांडणे योग्य नाही. शाहीन बागमध्ये सीएएविरोधात झालेल्या निषेध मोर्चात मोठय़ा संख्येने लोक जमा झाले होते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे. एखाद्या अपवादात्मक स्थितीत सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करायचे झाल्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणेची अनुमती घेऊनच पुढील कार्यवाही अंमलात आणायला हवी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.
विरोध व्हावा, पण अडवणूक नको!
लोकशाही राज्यपद्धतीत विरोध व्यक्त करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मात्र, त्यासाठी रस्ते अडवून ठेवणे योग्य नाही. विरोध संसदेत व्यक्त करणे असो वा रस्त्यावर; तो शांततापूर्णच असला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. शाहीनबाग सारख्या सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱया आंदोलनांवर कारवाई करून सार्वजनिक स्थाने खुली ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
100 पेक्षा अधिक दिवस आंदोलन
नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ शाहीन बागेत लोक 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस धरणे लावून बसले होते. परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे दिल्लीत 144 कलम लागू झाल्यानंतर पोलिसांनी तेथील निदर्शकांना तेथून हलवले. शाहीनबाग आंदोलकांना तेथून हटवावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयानेही केले होते. सीएएविरोधी या आंदोलनामुळे या भागातील बरेच रस्ते बंद झाले होते. तसेच सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम झाला होता.
‘शाहीन बाग’ची ओळख…
शाहीन बाग हा भारताची राजधानी दिल्लीच्या दक्षिणेस असलेला एक निवासी भाग आहे. यमुनेच्या काठी वसलेले हे ठिकाण दिल्ली ते नोएडाला जोडणाऱया रस्त्यावर आहे. या परिसराला पूर्वी ‘शाहीन बाज’ असे म्हटले जात होते. या भागात नोएडा, नेहरू प्लेस, सरिता विहार, जसोला, ओखला औद्योगिक क्षेत्र, कालिंदी कुंज आणि ओखला रेल्वेस्थानक अशी महत्त्वाची केंद्रे आहेत. त्याशिवाय जामिया मिलिया इस्लामिया, जामिया हमदर्द आणि एमिटी युनिव्हर्सिटीसारख्या विद्यापीठांशीही या भागाचा जवळचा संपर्क आहे. तसेच जसोला विहार शाहीन बाग मेट्रो स्टेशनही शाहीन बागला दिल्ली मेट्रो नेटवर्कशी जोडते.