नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हरियाणा-दिल्लीच्या टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱयांपैकी एका आंदोलक शेतकऱयाने झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव कर्मवीर (वय 52) असून ते हरियाणातील जींद येथील सिंघवाल गावचे रहिवासी आहेत. आत्महत्येपूर्वी या शेतकऱयाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केंद्रातील मोदी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. नवीन कृषी कायदे मागे घेण्यात सरकार तारखेवर तारीख देत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे काळे कायदे कधी रद्द होतील माहिती नाही, जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत शेतकऱयांनी आपला निर्धार कायम ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. टिकरी सीमेवर आंदोलन करताना सेक्टर-9 जवळ बायपास पार्कमध्ये एका झाडाला त्यांनी स्वतःला लटकवून घेतले.









