नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऍमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या जास्त घातक रुपाचा प्रसार जगभरात झपाटय़ाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतात येणाऱया विदेशी प्रवाशांसाठी नवे अधिक कठोर नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोणत्याही देशातून विमानाने भारतात येणाऱया प्रवाशांसाठी मागच्या 14 दिवसांच्या प्रवासाची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विमानतळावर उतरल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. हे नियम ज्या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाचा धोका जास्त आहे, त्या देशांच्या प्रवाशांसाठी आहेत.
कोरोनाच्या नव्या रुपाच्या विषाणूंची बाधा झालेले रुग्ण असणाऱया देशांना ‘धोक्याच्या छायेतील देश’ (कंट्रीज ऍट रिस्क) अशी संज्ञा देण्यात आली आहे. अशा देशांमधील प्रवासी भारतात आल्यास त्यांना विमानतळावरच चाचणीला सामोरे जावे लागेल. तसेच चाचणीचा अहवाल हाती पडेपर्यंत विमानतळावरच थांबावे लागेल. त्यांचा अहवाल नकारात्मक आला तरी त्यांना 7 दिवस विलगीकरणात रहावे लागेल. आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करावी लागेल आणि ती नकारात्मक आली तरी पुढचे 7 दिवस स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावे लागेल.
इतर विदेशी प्रवाशांना त्यांच्या प्रकृतीवर स्वतःच 14 दिवसांपर्यंत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एअर सुविधा पोर्टलवर सर्व प्रवाशांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल अपलोड करावा लागणार आहे.









