चीन, ब्रिटन, जर्मनीसह 14 देशांवर बंदी कायम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असलेल्या 14 देशांमधील सेवा अद्याप पूर्ववत करण्यात आलेली नाही. प्रतिबंधित देशांच्या यादीत युरोपियन युनियन आणि इतर काही देशांचाही समावेश आहे. सद्यस्थितीत ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर या देशांमध्ये सर्वसाधारण प्रवाशांसाठी विमाने पाठविली जाणार नाहीत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्यासाठी भारताने 25 हून अधिक देशांसोबत ‘एअर बबल’ करार केले आहेत.
कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी लागू करण्यात आली होती. मात्र, कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झालेल्या देशांसाठी पुन्हा उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. पुढील महिन्यापासून म्हणजे डिसेंबरपासून कोविडमुळे उड्डाणांवरील बंदी उठवली जाईल, असे संकेत सरकारकडून आधीच देण्यात आले होते. विमानांवरील बंदी उठवण्यासाठी पर्यटन उद्योगाकडून सरकारवर दबाव आणला जात होता. कोरोना नियंत्रणात असलेल्या देशांमध्ये उड्डाणे सुरू करण्याची विनंती पर्यटन उद्योगाने सरकारकडे वारंवार केली होती.









