ऑगस्टपासून प्रारंभाची तयारी : विमानोड्डाण मंत्र्यांचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशांतर्गत विमान वाहतुकीला प्रारंभ केल्यानंतर लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे शनिवारी केंद्रीय विमानोड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट महिन्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले. ही विमानसेवा सुरू करण्यापूर्वी दोन्ही देशांमधील कोरोनाच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विमानोड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी फेसबुक पेजवर लाईव्ह येत महत्त्वाची माहिती दिली. विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपन्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक आहेत. 25 मे पासून जवळपास 33 टक्के देशांतर्गत सेवा सुरू होत आहे. या सेवेतील बऱयाच विमानांचे बुकींग आता सुरू झालेले आहे. या सेवेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय सेवेलाही प्रारंभ करण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा जोर ओसरताच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
देशांतर्गत विमानसेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
वेगवेगळय़ा देशांमध्ये अडकलेल्या जवळपास 25 हजार भारतीयांना ‘वंदे भारत’ मिशनच्या माध्यमातून मायदेशी आणण्यात आले. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत ही संख्या 50 हजारपर्यंत पोहोचेल. ‘वंदे भारत मिशन’साठी खासगी विमान कंपन्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाचा विचार करून त्यांनाही या सेवेत सामावून घेण्यात येत असल्याचे पुरी यांनी सांगितले. अन्य देशांमधून भारतीयांना मायदेशी आणतानाच लॉकडाऊन काळात आठ हजार लोकांना विदेशातही पाठविण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले.
‘आरोग्य सेतू ऍप लाभदायी’
आरोग्य सेतू ऍप हे सर्वांसाठीच कोरोना संदर्भासाठी उत्तम संपर्क ट्रेसिंग डिव्हाईस आहे. या ऍपवर ग्रीन स्टेटस असणाऱया प्रवाशांना क्वारटाईन करण्याची गरज आकलनापलीकडे असल्याचे सांगत हे ऍप सर्वांनी डाऊनलोड करावे, असे आवाहनही त्यांनी केले.









