ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. सात दिवसांनंतर आठव्या दिवशी संबंधित प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. 11 जानेवारीपासून हा आदेश लागू होणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात येणाऱ्या प्रवाशांकडे 72 तासांपूर्वीचा आरटी-पीसीआर रिपार्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. हे रिपोर्ट बोगस आढळून आल्यास प्रवाशाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, 1 डिसेंबरपासून लागू झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांचा जोखिममध्ये समावेश करण्यात आला होता. आता या देशांमध्ये नव्याने घाना, टांझानिया, काँगो, इथिओपिया, कझाकिस्तान, केनिया, नायजेरिया, टय़ुनिशिया आणि झांबिया यांचा समावेश करण्यात आला आहे.