वरवेलीतील युवकाचे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग
प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील वरवेलीतील वैभव पवार यांनी आपल्या दीड हेक्टर क्षेत्रात काजू बागायतीमध्ये झेंडू, केळी, भेंडी, गवार, हळद व आले यांचे आंतरपीक घेऊन शाश्वत शेतीची कास धरली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने या कामी चांगली बळ दिले आहे.
केवळ फळबाग लागवड करण्यापेक्षा त्यामध्ये आंतरपीक घेतले तर कुटुंब आर्थिक सक्षम बनू शकते, हेच वैभव पवार यांनी दाखवून दिले आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी एमआरजीएस योजनेंतर्गत फळबाग लागवडीमधून 2017-18 मध्ये त्यांनी दीड हेक्टरवर काजू लागवड केली आहे. यामध्ये आंतरपीक घेतले तर सर्वच क्षेत्र ओलिताखाली येईल, असा विचार सुरू केला. गुहागर पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी विभाग यांचे त्यांनी यासाठी मार्गदर्शन घेतले. यासाठी त्यांनी झेंडू या संकरित पिकाची लागवड केली. तसेच भेंडी, गवार, हळद यांचीही लागवड केली. यामधून गतवर्षी सुमारे 2 लाखापर्यंतचे उत्पन्न मिळवण्यात त्यांना यश आले.
आंतरपीक लागवडीचे क्षेत्र वाढवत असताना पाण्याची कमतरता पडू लागली. यासाठी दुसऱया वर्षी एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहीर मे 2020मध्ये पूर्ण केली. शासनाच्या योजनेतूनच सोलर पंप बसवला. यावर्षी गुहागरच्या प्रसिद्ध एसके 4 या हळदीची लागवड 30 गुंठय़ात केली आहे. दुसऱया क्षेत्रात झेंडू, भेंडी, गवार, भुईमुग आदी पिकाबरोबर 10 क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून आल्याची लागवड केली आहे. लॉकडाऊनमध्येही कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही लागवड केली असून या आंतरपिकाबरोबर काजू या फळबागेची जोमाने वाढ होत आहे. पवार यांच्या शेतीमधील या उपक्रमाची गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी पाहणी करून त्यांना शेतीसाठी पुरक योजनेंचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या शेतकऱयाला कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव कांबळे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.









