प्रतिनिधी / सातारा :
शिरवळ येथे कोयत्याचा धाक दाखवत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारी व सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी करणारी आंतरजिल्हा सराईत टोळी शिरवळ पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीतील तीन आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या मुलीच्या घरात घुसून आरोपी मनोज संदीपान शिंदे (वय 42 रा. बोराटवाडी ता. इंदापुर), अजय संजय आढाव (वय 21 रा. मेडद ता. माळशिरस), सचिन प्रकाश जाधव (वय 28 रा. मेडद ता. माळशिरस) यांनी मुलीच्या घरातील सदस्यांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून नेहण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे आरोपी फरार झाले होते. याच्याविरूद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या आरोपीचा शोध शिरवळ पोलीसांचे तपास पथक करत होते. या चोरट्यांना पकडण्यात तपास पथकाला शनिवारी यश आले. या अपहरणाच्या गुन्ह्यासह आरोपीनी लोणंद पोलीस ठाणे, नातेपुते पोलीस ठाणे जि. सोलापूर, सांगोला पोलीस ठाणे, आटपाडी पोलीस ठाणे जि. सांगली यांच्या हद्दीत चैन स्नॅचिंग, जोडप्यांना आडरानात अडवून त्याना मारहाण करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने ,मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज जबरीने चोरून नेला आहे. तसेच सोन्याच्या दुकानात चाकूचा धाक दाखवून जबरीने सोने चोरून नेले आहे. या सर्व गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली आहे.









