जि.प.अध्यक्षांशी चर्चेत होणार पुढील निर्णय
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आंतरजिल्हा बदलीने परजिह्यात जाणाऱया प्राथमिक शिक्षकांची यादी जाहीर होऊन त्यात सोलापूर, नंदुरबार, धुळे, सातारा या जिह्यांत जाणाऱयांची संख्या अधिक आहे. या प्राथमिक शिक्षकांना सोडण्याचा निर्णय झाला तर त्याचा परिणाम रत्नागिरी जिह्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षक संख्येवर होणार आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेसंदर्भात जिल्हय़ात निर्माण होणाऱया शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत जि.प.अध्यक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे जि.प.शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा गुरूवारी सभापती सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत प्राथमिक शिक्षक बदल्यांवर प्रकर्षाने चर्चा झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची भरतीची प्रक्रिया काही वर्षांपुर्वी स्थानिक पातळीवर होत होती. त्यानंतर ही प्रक्रिया राज्यस्तरावरुन राबविण्यात येऊ लागली. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली गुणवत्ता स्थानिक उमेदवारांमध्ये असुनही अनेकांना यामध्ये संधीच मिळत नाही. परजिह्यातील शिक्षकांच्या नियुक्ती झाली की ते काही वर्षानंतर पुन्हा गावाकडे जाण्यास सज्ज होत असतात.
शाळांमधील शिक्षकच अर्ध्यावरुन गेल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी शिक्षकच उपलब्ध नसतात. यंदाही आंतरजिल्हा शिक्षक बदलीमुळे पुन्हा गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आंतरजिल्हा बदलीने रत्नागिरी जिह्यातून जाणाऱया शिक्षकांची 330 जणांची यादी जाहीर झाली आहे. मराठी माध्यमातील 324 शिक्षकांमध्ये सोलापूरला सर्वाधिक शिक्षक जाणारे आहेत. त्यापाठोपाठ धुळे, नंदुरबार, सातारा जिह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य जिह्यात जाणारेही अधिक शिक्षक असून उस्मानाबाद, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, जालना, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद या जिह्यात जाणाऱया शिक्षकांचेही प्रमाण आहे. शाळांची पदे रिक्त राहणार असतील तर शिक्षकांना सोडणार नाही अशी भुमिका जिल्हा परिषद प्रशासनाने यापुर्वी घेतली होती. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शिक्षक बदल्यांविषयी कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लागले होते. अगोदरच जिल्ह्य़ात 650 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात 330 शिक्षक परजिल्ह्य़ात बदलीने गेले तर येथील 1 हजार शिक्षकांची पदे रिक्त होणार आहेत. ही समस्या लक्षात घेत जि.प.अध्यक्ष रोहन बने यांच्याशी चर्चा करून बदल्यांबाबत पुढील निर्णय होईल असे सभापती सुनील मोरे यांनी सांगितले.









